मुक्कामाला येणारी बस आगारातच थांबली; प्रवाशांची गैरसोय वाढली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:19 AM2021-07-31T04:19:41+5:302021-07-31T04:19:41+5:30
अकोला : एसटी महामंडळाने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर पूर्ण क्षमतेने प्रवासी सेवा सुरू केली. यात लाल परी, शिवशाही गाड्यांचा समावेश ...
अकोला : एसटी महामंडळाने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर पूर्ण क्षमतेने प्रवासी सेवा सुरू केली. यात लाल परी, शिवशाही गाड्यांचा समावेश आहे; मात्र ग्रामीण भागाची जीवनवाहिनी समजली जाणारी एसटी अद्यापही ग्रामीण भागापासून दूरच आहे. ग्रामीण भागात मुक्कामी जाणाऱ्या गाड्या बंद आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांची गैरसोय होत आहे.
एसटीची प्रवासी सेवा सुरू असली तरीही अद्यापही ५० टक्के एसटी गाड्या आगारातच थांबून आहेत. अद्यापही शाळा सुरू झालेल्या नाही. पाऊस, खराब रस्ते व ग्रामीण भागात प्रवाशांचा कमी असणारा प्रतिसाद यामुळे बहुतांश एसटी मुक्कामी जाणे बंद झाले आहे, तर दुसरीकडे गावात एसटी येत नसल्याने ऑटो, काळी-पिवळीचा व्यवसाय मात्र जोरात सुरू आहे. बस सुरू नसल्याने प्रवाशांनाही खासगी वाहनांशिवाय पर्याय नाही. तसेच मोठ्या शहरांमध्ये जाणाऱ्या फेऱ्यांच्या मार्गात येणाऱ्या खेड्यापाड्यांना बस थांबत असल्याचे महामंडळाकडून सांगण्यात आले.
आगारनिहाय बसेस...
आगार क्रमांक १ - २६
आगार क्रमांक २ - ३०
अकोट - ३५
तेल्हारा - १९
मूर्तिजापूर - १७
५० टक्के बसेस आगारातच
अकोला जिल्ह्यातील ५ आगारांतील वाहतूक सुरू आहे; मात्र जवळपास ५० टक्के गाड्या आगारातच उभ्या आहेत.
प्रवाशांचा प्रतिसाद नसल्याने गाडी तोट्यात सोडण्यापेक्षा आगारात थांबून ठेवणे ही एसटीची भूमिका आहे.
त्यामुळे गाड्यांच्या फेऱ्या कमी करणे, मुक्कामी गाड्या बंद करणे आदी कारणांमुळे बसेस आगारातच उभ्या आहेत.
रुग्ण घटले; एसटी कधी धावणार?
कोराेना रुग्णांची संख्या नियंत्रणात आहे. यामुळे आगारांनी सर्व बसेस सुरू करायला हव्यात. ग्रामीण भागात बसेसची अपेक्षा आहे. तालुक्याच्या गावी जाण्यासाठी शेतकरी बसचा वापर करतात. गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रवास सुरू आहे. हा प्रवास खंडित करू नये.
- विनय गवई, प्रवासी
पारस ते अकोला असा नियमित प्रवास करत आहे. यासाठी बस हा एकमेव चांगला पर्याय आहे. हा पर्याय चांगला असला तरी बसेस कमी केल्या आहेत. गावात मुक्कामी येणारी बस बंद आहे. त्यामुळे गैरसोय होत आहे.
- श्रीकृष्ण इंगळे, प्रवासी
...या गावांना मुक्कामी फेऱ्या नाहीत!
जिल्ह्यात बहुतांश गावांमध्ये मुक्कामी फेऱ्या बंद करण्यात आल्या आहे. यामध्ये पातूर नंदापूर, पारस, धामणा, खेट्री, वाडेगाव आदी गावांचा समावेश आहे. शाळा सुरू झाल्यानंतर या फेऱ्या पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे.