डेबिट कार्डची माहिती विचारून व्यापाऱ्याच्या खात्यातून दीड लाख काढले!
By नितिन गव्हाळे | Published: October 18, 2023 08:15 PM2023-10-18T20:15:52+5:302023-10-18T20:16:02+5:30
अकोट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल, सैन्यात असल्याचे भासवून फसवणूक
अकोला: सैन्यात असल्याचे भासवून एका व्यापाऱ्याला लोखंडी गेट खरेदी करण्याची भूलथाप दिली आणि त्या बहाण्याने डेबिट कार्डसह ओटीपी मागवून व्यापाऱ्याच्या खात्यातून टप्प्याटप्याने दीड लाख रूपये काढून फसवणूक केल्याचा प्रकार १६ ऑक्टोबर रोजी अकोट येथे घडला. या प्रकरणात अकोट शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
अकोट येथील शेख अहमद शेख बशीर(५०) यांच्या तक्रारीनुसार त्यांचे अंजनगाव रोडवर स्टील फर्निचरचे दुकान आहे. १६ ऑक्टोबर रोजी दुपारी त्यांच्या मोबाइल व्हॉट्सॲपवर हाय म्हणून मॅसेज आला. त्यावर प्रविण कुमार इंडीयन आर्मी असे व फोटो होता. त्यानंतर त्याने शेख अहमद यांच्याकडे लोखंडी गेटचे काम आहे. किती खर्च येइल अशी विचारणा केली.
त्यांनतर त्याने अहमद यांना १५ हजार रूपये रोख पाठविण्याचे सांगितले आणि व्हाॅटस्ॲपवर मॅसेज पाठवून रक्कम फेल झाल्याबाबतचा फोटो पाठविला व अहमद यांना डेबिट कार्डची मागणी केली. त्यानुसार अहमद यांनी डेबिट कार्डाचा मागील व पुढील बाजुचा फोटो पाठविला. त्यानंतर ओटीपी मागितला असता, अहमद याने आरोपीला ओटीपी दिल्यानंतर त्याने टप्प्याटप्प्याने बँक खात्यातून १ लाख ४८ हजार ४२० रूपये काढून फसवणूक केली. या प्रकरणात अकोट शहर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल केला.