अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी दीड कोटीचा प्रस्ताव!
By admin | Published: July 3, 2017 02:12 AM2017-07-03T02:12:27+5:302017-07-03T02:12:27+5:30
अकोला : विमा न काढलेल्या जिल्ह्यातील १ हजार ८६४ शेतकऱ्यांच्या मदतीसाठी १ कोटी ३९ लाख ९८ हजार ४६८ रुपये मदत निधी मागणी शासनाकडे सादर करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : गतवर्षी अतिवृष्टी व पुरामुळे पीक नुकसान झालेल्या मात्र पीक विमा न काढलेल्या जिल्ह्यातील १ हजार ८६४ शेतकऱ्यांच्या मदतीसाठी १ कोटी ३९ लाख ९८ हजार ४६८ रुपये मदत निधी मागणीचा जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत २० जून रोजी शासनाकडे सादर करण्यात आला.
गतवर्षीच्या पावसाळ्यात जुलै ते आॅक्टोबर २०१६ या चार महिन्यांच्या कालावधीत वादळी वाऱ्यासह अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यातील शेती पिके आणि फळ पिकांच्या नुकसानाचे सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचा आदेश शासनामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला होता. त्यानुसार जिल्ह्यातील अकोला, बाळापूर, बार्शीटाकळी व पातूर या चार तालुक्यांत २ हजार १२८ शेतकऱ्यांचे १ हजार ७४९ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा अहवाल गत ८ मे २०१७ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनाकडे सादर करण्यात आला होता; परंतु अतिवृष्टी व पुरामुळे पिकांचे नुकसान झालेले शेतकरी आणि शेतीच्या क्षेत्रापैकी गतवर्षी पीक विमा काढलेले शेतकरी आणि पीक नुकसानाचे क्षेत्र वगळून,ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला नाही, अशा अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी लागणाऱ्या मदत निधीची माहिती सादर करण्याचे निर्देश शासनाचे मुख्य सचिव आणि मदत व पुनर्वसन विभागाच्या अपर मुख्य सचिवांनी १२ जून २०१७ रोजी पत्राद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयाला दिले. त्यानुसार जिल्ह्यात गतवर्षी पीक विमा न काढलेल्या १ हजार ८६४ शेतकऱ्यांच्या २ हजार ५२ हेक्टर क्षेत्रावरील पिकांच्या नुकसानभरपाईपोटी १ कोटी ३९ लाख ९८ हजार ४६८ रुपये मदत निधी मागणीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत २० जून रोजी शासनाकडे सादर करण्यात आला.