दीड हजार क्विंटल धान्याची आवक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:14 AM2021-07-18T04:14:33+5:302021-07-18T04:14:33+5:30
एसटीचे तिघे निलंबित अकोला : अनलॉकमध्ये बससेवा काही प्रमाणात पूर्ववत होत आहे. एसटीच्या फेऱ्याही वाढल्या असून, प्रवाशांकडून प्रतिसादही मिळत ...
एसटीचे तिघे निलंबित
अकोला : अनलॉकमध्ये बससेवा काही प्रमाणात पूर्ववत होत आहे. एसटीच्या फेऱ्याही वाढल्या असून, प्रवाशांकडून प्रतिसादही मिळत आहे. दरम्यान, दीर्घ काळ रजेवर राहणे, रात्री पाळीच्या फेऱ्यांवर ड्युटी लावल्यावर हजर न होणे अशा विविध कारणांमुळे एसटी महामंडळाने आगार क्रमांक २ येथील ३ कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. हे कर्मचारी १५ दिवसांसाठी निलंबित करण्यात येत असल्याची माहिती एसटी महामंडळाकडून मिळाली.
आंब्याची विक्री सुरूच!
अकोला : यंदा जून, जुलै महिन्यात काही काळ पावसाने पाठ फिरविल्याने आंबे विक्रेत्यांचे फावले आहे. सामान्यत: पावसाळा सुरू होताच, आंब्याची विक्री ठप्प होते, परंतु मान्सूनच्या दीड महिन्यानंतरही आंब्याची विक्री सुरूच आहे. आवकही सुरू असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
वन पर्यटन सुरू!
अकोला : कोरोनामुळे गत दीड वर्षापासून बंद असलेले वन्य अभयारण्य व व्याघ्र प्रकल्प सुरू झाले आहे. मध्यंतरी दोन-चार दिवस अभयारण्य बंद होते. ते आता पुन्हा १४ जुलैपासून सुरू झाले आहे. यामुळे निसर्ग व पर्यटनप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
एकाच दिवसात ४.१० दलघमी साठा
अकोला : मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. एकाच दिवसामध्ये ५ प्रकल्पांच्या पाणीसाठ्यात ४.१० दलघमीची वाढ झाली आहे. काटेपूर्णा प्रकल्पात सर्वाधिक वाढ झाली.
मेस संचालकांचे आर्थिक नुकसान
अकोला : कोरोना संकटामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शहरातील शिकवणी वर्ग व कॉलेज परिसरात मोठ्या प्रमाणात मेस आहेत. शिक्षण, तसेच काही व्यवसाय अजूनही ठप्पच आहेत. त्यामुळे मेस संचालकांचे मोठे नुकसान होत आहे.
टिळक रोडवर वाहतुकीची कोंडी
अकोला : शहरातील वाहनांची वर्दळ वाढली आहे. त्यामुळे टिळक रोडवर वाहनांची दररोज कोंडी होऊन वाहतुकीची समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे या मार्गावर जाताना मोठ्या अडचणी येत आहे.
फूल व्यवसाय रुळावर!
अकोला : निर्बंधांमुळे फूल व्यवसायावर अवकळा आली आहे. मात्र, आता अनलॉकमध्ये फूल व्यवसाय पुन्हा रुळावर येत आहे. यामुळे जिल्ह्यातील ११२ फूल विक्रेत्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.