अजून दीड वर्ष चालेल ‘आरओबी’चे बांधकाम!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 12:34 PM2019-02-11T12:34:54+5:302019-02-11T12:35:04+5:30
अकोला: मागील अडीच वर्षांपासून सुरू असलेल्या डाबकी रेल्वे गेटजवळील ‘आरओबी’च्या (रेल्वे ओव्हर ब्रीज) बांधकामास अजून दीड वर्षांचा कालावधी लागणार असल्याचे संकेत आहेत.
- संजय खांडेकर
अकोला: मागील अडीच वर्षांपासून सुरू असलेल्या डाबकी रेल्वे गेटजवळील ‘आरओबी’च्या (रेल्वे ओव्हर ब्रीज) बांधकामास अजून दीड वर्षांचा कालावधी लागणार असल्याचे संकेत आहेत. रेल्वे हद्दीतील पुलाचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी भुसावळ रेल्वे विभागाने १८ महिन्यांचा कालावधी मागितला आहे. त्यामुळे अकोलेकरांना आजपासून पुन्हा दीड वर्षांपर्यंत प्रतीक्षा करण्याची वेळ आली आहे.
अकोला-शेगाव मार्गावरील रहदारी सुरळीत करण्यासाठी जोडण्यात येत असलेल्या डाबकी आरओबीचे बांधकाम २०१६ पासून सुरू असून, आता त्याचे बांधकाम शेवटच्या टप्प्यात आहे. काही दिवसांतच हा पूल लोकसेवेत रुजू होईल, असे वाटत होते; मात्र भुसावळ रेल्वे विभागाने त्यांच्या हद्दीतील पूल बांधकामासाठी १८ महिन्यांचा अवधी मागितल्याने अकोलेकरांना आणखी दीड वर्ष प्रतीक्षा करावी लागणार आहे. जवळपास १६ कोटींच्या खर्चातून डाबकी रेल्वे ओव्हर ब्रीज उभारण्याचे काम २७ आॅक्टोबर २०१६ पासून झाले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देखरेखित सुरू असलेले काम आता शेवटच्या टप्प्यात असून, आगामी मार्च अखेरपर्यंत दोन्हीकडील डांबरीकरणही पूर्ण होणार आहे. डाबकी रेल्वे गेटच्या दोन्हीकडील भाग तयार असले तरी रेल्वे रुळावरून जाणाऱ्या पुलाच्या बांधकामाला अद्याप सुरुवात झालेली नाही. रेल्वेच्या हद्दीत असलेले हे बांधकाम रेल्वे विभागातील अभियंत्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. भुसावळ विभागाचे मुख्य अभियंता यांच्या पुढाकारात हा सर्व्हे होणार आहे. त्यानंतर या बांधकामास सुरुवात होईल, असेही सूत्रांनी सांगितले आहे.
रेल्वे गेटची वाहतूक पर्यायी मार्गे वळविणार!
पुलाचे बांधकाम सुरू होण्याआधी रेल्वे विभागातर्फे रेल्वे गेटच्या मार्गे असलेली दैनंदिन वाहतूक पर्यायी मार्गे काही अंतरावरून वळविली जाणार आहे. ही प्रक्रिया महिन्याभरात होण्याची शक्यता आहे. त्यानंतर दोन्हीकडील पुलाला जोडण्याचे काम सुरू होईल. यासाठी संपूर्ण टीम रेल्वेची येणार आहे. बांधकाम सुरू झाल्यापासून १८ महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे ते काम कधी सुरू होते, यावर १८ महिन्यांचा कालावधी ठरून आहे.
-सार्वजनिक बांधकाम विभागाचे काम शेवटच्या चरणात आहे. आमच्या हद्दीतील कामाचा अहवाल आम्ही वरिष्ठांकडे सोपविला असून, आता पुढील बांधकाम रेल्वे विभागातर्फे पूर्ण केले जाईल.
-जी. व्ही. जोशी, अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, अकोला.