अकोल्यासाठी हवे एक हजार कोटी!
By admin | Published: November 13, 2016 02:11 AM2016-11-13T02:11:22+5:302016-11-13T02:11:22+5:30
स्टेट बँकेची रिझर्व्ह बँकेकडे मागणी.
अकोला, दि. १२- बुधवार ९ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून चलनातून बाद झालेल्या जुन्या पाचशे व हजाराच्या नोटा बदलून घेण्यासाठी शहरातील बँकांमध्ये गुरुवार व शुक्रवारप्रमाणेच शनिवारीसुद्धा ग्राहकांनी प्रचंड गर्दी केली होती. अकोलेकरांची मागणी पूर्ण करण्यासाठी स्टेट बँकेने एक हजार कोटींची मागणी रिझर्व्ह बँकेकडे केली असल्याची माहिती आहे.
बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे व एक हजाराच्या नोटा बंदीसंदर्भात केलेल्या घोषणेनंतर शहरातील सर्व राष्ट्रीयीकृत बँका व एटीएम केंद्रांवर गुरुवार व शुक्रवारप्रमाणे शनिवारीसुद्धा ग्राहकांनी प्रचंड गर्दी केली होती. बँकांनीदेखील महिन्याचा दुसरा शनिवार असताना, चलनात नव्याने आलेल्या नोटा ग्राहकांना वितरित करण्यासाठी १२ नोव्हेंबर रोजी बँका पूर्णवेळ सुरू ठेवल्या होत्या. शहरातील सर्व बँकांना अकोल्यातील स्टेट बँक व महाराष्ट्र बँकेच्या करन्सी चेस्टमार्फत पतपुरवठा केला जातो. अकोल्यात अद्यापपावेतो, रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या नव्या नोटांपैकी केवळ दोन हजाराच्याच नोटा दाखल झाल्या आहेत. रिझर्व्ह बँकेकडून पाचशे रुपयांच्या नव्या नोटांचा अद्याप पुरवठा सुरू झाला नसल्याने, रद्दबातल झालेल्या जुन्या नोटा घेऊन येणार्या प्रत्येक ग्राहकास किमान चार हजार रुपयांचा पुरवठा करण्याचे धोरण बँकांनी स्वीकारले असून, नवीन पाचशे रुपयांच्या नोटाच उपलब्ध नसल्याने ग्राहकांना रक्कम अदा करताना बँक कर्मचार्यांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागत आहे. दिवसाला २0 कोटींप्रमाणे १२ नोव्हेंबरपर्यंत स्टेट बँकेच्या करन्सी चेस्टमार्फत ६0 कोटी रुपयांचा पुरवठा शहरातील बँकांना करण्यात आला असल्याची माहिती स्टेट बँकेच्या मुख्य शाखेचे प्रबंधक एस. टी. बोर्डे यांनी दिली. शहरात १३५ हून अधिक एटीएम असले तरी, बहुतांश एटीएममध्ये ठणठणाट आहे. अद्याप शहरातील एटीएम केंद्रांमधून दोन हजाराच्या नव्या नोटा वितरित करण्याची सुविधा उपलब्ध नसल्याने आर्थिक व्यवहार पूर्ण करण्यासाठी अकोलेकर बँकेकडे धाव घेत आहेत. तिसर्या दिवशीसुद्धा बँकांसमोर गर्दी कायम असल्याने स्टेट बँकेने अकोलेकरांची आर्थिक पूर्तता करण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडे एक हजार कोटी रुपयांची मागणी केली असल्याची माहिती अधिकार्यांनी दिली.
सहाय्य करण्याची विनंती उद्घोषणेद्वारे
स्टेट बँकेच्या टॉवर चौकातील मुख्य शाखेत ग्राहकांना उद्घोषणेद्वारे सहाय्य करण्याची विनंती केली जात आहे. तर सुटीच्या दिवशी बँकांच्या वेळेची माहितीसुद्धा दिली जात आहे.
- सुटीचा दिवस असतानासुद्धा शहरातील बँका शनिवारप्रमाणेच रविवारीसुद्धा पूर्ण वेळ सुरू राहणार आहेत. ग्राहकांना १0, २0, ५0, १00 व चलनात नव्याने दाखल झालेल्या दोन हजारांच्या नोटांचा पुरवठा केला जात आहे. विस्कटलेली घडी पूर्ववत करण्यासाठी अधिक पतपुरवठा करण्याची मागणी रिझर्व्ह बँकेकडे करण्यात आली आहे. बदलत्या आर्थिक स्थितीत ग्राहकांनी बँकांना सहकार्य करावे.
- एस. टी. बोर्डे
मुख्य प्रबंधक, स्टेट बँक ऑफ इंडिया, मुख्य शाखा, अकोला.