अपघाती मृत्यू प्रकरणात एक कोटी नुकसान भरपाई देण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 01:53 AM2017-11-15T01:53:26+5:302017-11-15T01:53:36+5:30
अपघातात मरण पावलेल्या मृतकाच्या परिवारास महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाने १ कोटी १ लाख ७२ हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी, असा महत्त्वपूर्ण निकाल प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. झेड. ख्वाजा यांच्या न्यायालयाने मंगळवारी दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : अपघातात मरण पावलेल्या मृतकाच्या परिवारास महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाने १ कोटी १ लाख ७२ हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी, असा महत्त्वपूर्ण निकाल प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. झेड. ख्वाजा यांच्या न्यायालयाने मंगळवारी दिला.
बाश्रीटाकळी तालुक्यातील जांभरूण येथील डॉ. संतोष तुकाराम डाखोरे हे चंद्रपूर जिल्हा परिषदेमध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होते. २७ एप्रिल २0१६ रोजी डॉ. डाखोरे ब्रम्हपुरी ते वरोरा एसटी बसने प्रवास करीत होते. चंद्रपूर जिल्हय़ातील भिसी पोलीस ठाण्यांतर्गत येणार्या शंकरपूर चिमूर रोडवर एसटी क्रमांक एमएच 0७ सी ७७२७ ने विरुद्ध दिशेने येणार्या दुचाकीला धडक दिली. यावेळी एसटी चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे एसटी रस्त्याच्या कडेला उलटली. यामध्ये डॉ. डाखोरे यांचा मृत्यू झाला होता. भिसी पोलिसांनी एसटी चालक संतोष काकपुरे याच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३0४ अ नुसार गुन्हा दाखल करून अटक केली. मृतक संतोष डाखोरे यांच्यावतीने एसटी महामंडळावर नुकसान भरपाईचा दावा दाखल करण्यात आला होता. मृतक हा एमबीबीएस उत्तीर्ण व रेडिओलॉजीमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेत होता, तसेच मृतकाला ७0 हजारांपेक्षा जास्त पगार होता. ही बाब दावाकर्त्याच्या वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. या खटल्यात मृतकाची आई सुमन, वडील तुकाराम, भाऊ विष्णू आणि विजय यांना ही रक्कम विभागून देण्यात आली. याप्रकरणी मृतक संतोष डाखोरे यांच्यावतीने अकोल्यातील अँड. एस. एन. वखरे, अँड. नरेंद्र बेलसरे व अँड. दिनेश गढे यांनी कामकाज पाहिले.