डाक कर्मचा-यांचा एक दिवसीय लाक्षणिक संप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2017 03:08 AM2017-03-17T03:08:40+5:302017-03-17T03:08:40+5:30
कृती समिती सदस्यांनी मुख्य डाक घरासमोर धरणे दिले.
अकोला, दि. १६- ऑल इंडिया पोस्टल एम्लॉइज युनियन (एनएफपीई) व नॅशनल युनियन ऑफ पोस्टल एम्लॉइजन (एफएनपीओ) या डाक विभागाच्या दोन संघटनांनी गुरुवार, १६ मार्च रोजी एक दिवसीय लाक्षणिक संप पुकारला. संपादरम्यान दोन्ही संघटनांच्या कृती समिती सदस्यांनी मुख्य डाक घरासमोर धरणे दिले. सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीनंतर निर्माण झालेली विसंगती दूर करावी, १0 ते ३0 टक्क्यांपर्यंतचा घरभाडे भत्ता मंजूर करावा, २0१६ पूर्वीच्या नवृत्ती वेतनधारकांसंदर्भात सातव्या वेतन आयोगाने सुचविलेल्या तरतुदींची त्वरित अंमलबजावणी व्हावी, नवीन पेशन स्किम रद्द करून १ मार्च २0१४ नंतर डाक खात्यात रुजू झालेल्या कर्मचार्यांना पारंपरिक पेन्शन मंजूर करा, ग्रामीण डाक सेवकांना खात्यात सामावून त्यांना नियमित कर्मचार्यांप्रमाणे वेतन, नवृत्तीवेतन व अन्य लाभ द्यावे, डाक विभागात रोजंदारीवर काम करणार्या कामगारांची सेवा नियमित करून त्यांना वेतन व इतर आर्थिक लाभ देण्यात यावेत. सातव्या वेतन आयोगातील किमान वेतनप्रमाणे त्यांच्या वेतनात सुधारणा करण्यात याव्या. सरकारी कार्यप्रणालीचे खासगीकरण व कंत्राटीकरण थांबविण्यात यावे. बढती मिळालेल्या कर्मचार्यांना नवीन कॅडरमध्ये प्रवेश देण्यात यावा, नवीन पद भरतीच्या अडचणी तत्काळ दूर करून ती भरण्यात यावी, अनुकंपा भरतीवरील ५ टक्के बंधन दूर करून पात्र उमेदवारांना नियुक्ती द्याव, डाक विभागात विविध पदांवर काम करणार्या कर्मचार्यांच्या वेतनात समानता आणावी या व इतर अनेक मागण्यांच्या पूर्ततेसाठी हा एक दिवसीय लाक्षणिक संप पुकारण्यात आला. यावेळी संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष विनोद पाटील, धनंजय यमतकर, आर.एन. निंदाने, व्ही.बी. हिवराळे, सचिव शाकीर अहमद, गजानन बाबर, जि.आर. इंगळे, एल.एम. उजवणे, कोषाध्यक्ष व्ही. व्ही. तांदळे, व्ही. व्ही. अहीर, आर.ए. कुळकर्णी, एस.एस. मोडक यांच्यासह अन्य पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.