विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू
By admin | Published: August 13, 2016 01:39 AM2016-08-13T01:39:31+5:302016-08-13T01:39:31+5:30
तेल्हारा तालुक्यातील घटना; एकास वाचविण्याच्या प्रयत्नात दुसरा इसम गंभीर जखमी.
तेल्हारा (जि. अकोला), दि. १२ : तालुक्यातील भांबेरी येथील रहिवासी असलेल्या ४0 वर्षीय इसमाचा शुक्रवार, १२ ऑगस्टला सकाळी १0 वाजेपूर्वी विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. मात्र, त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात दुसरा ३0 वर्षीय इसम विजेचा धक्का लागून गंभीर जखमी झाला असून, त्याला पुढील उपचारार्थ अकोल्यास रवाना करण्यात आले आहे.
तेल्हारा तालुक्यातील भांबेरी येथील रहिवासी शेख शेखलाल शेख महेबूब (४0) या इसमास १२ ऑगस्टला सकाळी १0 वाजेपूर्वी विजेचा धक्का लागल्याने उपचारासाठी तेल्हारा ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले होते; परंतु त्याचा त्यापूर्वीच मृत्यू झाला होता. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अशोक तापडिया यांच्या लेखी मेमोवरून तेल्हारा पोलिसांनी १२ ऑगस्टला दुपारी १२.४४ वाजता याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. तेल्हारा ठाणेदार नंदकिशोर नागलकर यांच्या मार्गदर्शनाखाली हेकाँ. रवींद्र करणकार पुढील तपास करीत आहेत. शेख शेखलाल याला विजेचा धक्का लागत असताना त्याला वाचविण्याचा प्रयत्न भांबेरी येथील रहिवासी असलेल्या रवींद्र सारंगधर टाकहकर (३0) याने केला असता, तोसुद्धा गंभीर जखमी झाला. त्याला योगेश राऊत यांनी तेल्हार्याच्या शासकीय ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. परंतु, तेथील डॉक्टरांनी प्रथमोपचार केल्यानंतर सदर रुग्णास अकोल्यातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यासाठी १२ ऑगस्टला रवाना केले.