दिवसभरात एकाचा मृत्यू; १२ नवे पॉझिटिव्ह, १४ कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2020 06:13 PM2020-07-26T18:13:57+5:302020-07-26T18:53:15+5:30
रविवार, २६ जुलै रोजी अकोला शहरातील एकाचा मृत्यू झाला, तर १२ नवे पॉझिटिव्ह आढळून आले.
अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा धुमाकुळ सुरुच असून, या आजाराला बळी पडणाऱ्यांची व लागण होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. रविवार, २६ जुलै रोजी अकोला शहरातील एकाचा मृत्यू झाला, तर १२ नवे पॉझिटिव्ह आढळून आले. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा एकूण आकडा १०१ झाला असून, एकूण रुग्णसंख्या २४१२ वर गेली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘व्हीआरडीएल’ प्रयोगशाळेकडून रविवारी दिवसभरात ‘आरटीपीसीआर’ चाचणीचे ३३७ अहवाल प्राप्त झाले. यापैकी १२ अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ३२५ अहवाल निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये चार महिला व आठ पुरुषांचा समावेश आहे. यामध्ये सय्यदपुरा पातूर येथील तीन जण, दिवाली मैदान पातूर येथील दोन जण, तर रामनगर, चिंचखेड ता. बार्शीटाकळी व बोरगाव मंजू येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. सायंकाळी मराठा नगर, मोठी उमरी, काला चबुतरा व बाळापूर येथील चौघांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
४५ वर्षीय पुरुषाचा मृत्यू
रविवारी आणखी एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला. हा रुग्ण इकबाल कॉलनी येथील ४५ वर्षीय पुरुष असून, त्यांना २२ जुलै रोजी दाखल करण्यात आले होते.
१४ जणांना डिस्चार्ज
रविवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून चार जण, कोविड केअर सेंटर अकोला येथून चार जण, आयकॉन हॉस्पीटल येथून चार जण तर कोविड रुग्णालय मुर्तिजापूर येथून दोन जण, अशा एकूण १४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
३३१ अॅक्टिव्ह रुग्ण दाखल
आतापर्यंत १९८० जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून, १०१ जणांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत ३३१ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुुरु आहेत.