दिवसभरात एकाचा मृत्यू; ३५ नवे पॉझिटिव्ह, ३० जण कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 06:54 PM2020-07-27T18:54:03+5:302020-07-27T18:54:15+5:30
सोमवार, २७ जुलै रोजी अकोला शहरातील एका महिलेचा मृत्यू झाला, तर ३५ नवे पॉझिटिव्ह आढळून आले.
अकोला : कोरोनाचा कहर थांबण्याची काहीच चिन्हे नसून, या संसर्गजन्य आजाराला बळी पडणाऱ्यांची व लागण होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. सोमवार, २७ जुलै रोजी अकोला शहरातील एका महिलेचा मृत्यू झाला, तर ३५ नवे पॉझिटिव्ह आढळून आले. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा एकूण आकडा १०२ झाला असून, एकूण रुग्णसंख्या २४४८ वर गेली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘व्हीआरडीएल’ प्रयोगशाळेकडून सोमवारी ‘आरटीपीसीआर’ चाचणीचे ४९६ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ३५ अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ४६१ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह आलेल्या २५ जणांमध्ये १४ महिला व ११ पुरुषांचा समावेश आहे. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णांमध्ये चार जण हे तेल्हारा तालुक्यातील राणेगाव, चार जण हिवरखेड, चार जण पळसो-बढे, तीन जण बोरगाव मंजू, दोन जण अकोला शहरातील खदान भागातील, दोन जण नित्यानंद नगर, दोन जण जुने शहरातील, तर उर्वरित प्रत्येकी एक जण शिवणी, शंकरनगर, तारफैल व निपाना-कोठारी येथील असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. सायंकाळी १० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात पाच महिला व पाच पुरुष आहेत. यामध्ये रामनगर अकोला येथील चार जण, राणेगाव तेल्हारा येथील दोन जण तर उर्वरित हिवरखेड, बाळापूर, पातूर व मुर्तिजापूर येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
४० वर्षीय महिला दगावली
कोरोनाबाधितांच्या मृत्यूचे सत्र सुरुच असून, रविवार, २६ जुलै रोजी रात्री उशिरा एका ४० वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही महिला खैर मोहम्मद प्लॉट भागातील असून, त्यांना १८ जुलै रोजी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
३० जणांना डिस्चार्ज
सोमवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ११ जणांना, कोविड केअर सेंटर अकोला येथून १० जण, कोविड रुग्णालय मुर्तिजापूर येथून दोन जणांना तर हॉटेल रेजेन्सी येथून सात जणांना अशा एकूण ३० जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
३३६ जणांवर उपचार सुरु
जिल्ह्यात आतापर्यंत २४४८ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी १०२ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत २०१० जणांनी कारोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला असून, सद्यस्थितीत ३३६ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.