‘लॉकडाऊन’मुळे वेळेवर उपचार न मिळाल्याने एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2020 02:53 PM2020-03-27T14:53:13+5:302020-03-27T14:54:49+5:30
हिंगणा येथील ५१ वर्षीय इसमाचा लॉकडाऊनमुळे वेळेवर वाहन न मिळाल्याने २६ मार्च रोजी मृत्यू झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
दिग्रस बु.: कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. तसेच रस्त्यावर वाहनांनाही बंदी लादण्यात आली आहे. हृदयविकाराच्या धक्क्याने हिंगणा येथील ५१ वर्षीय इसमाचा लॉकडाऊनमुळे वेळेवर वाहन न मिळाल्याने २६ मार्च रोजी मृत्यू झाला.
गट ग्रामपंचायत हिंगणा (उजाडे) येथील विजय प्रल्हाद गायकवाड (५१) हे घरात असताना गुरुवारी त्यांच्या छातीत दुखायला लागले. अचानक त्यांची प्रकृती जास्त बिघडली. त्यांना उपचाराकरिता अकोला येथे घेऊन जाण्यासाठी वेळेवर वाहन उपलब्ध झाले नसल्याने काही वेळ त्यांच्या नातेवाइकांना वाहनांची ताटकळत वाट पाहावी लागली; परंतु त्यांना वेळेवर वाहन मिळाले नाही. शेवटी विजय गायकवाड यांना त्यांच्या नातेवाइकांनी गावातील दुचाकी काढून ३५ किलोमीटर हिंगणा-वाडेगाव-गोरेगाव-माझोड मार्गे कसेबसे अकोला येथे सर्वोपचार रुग्णालयात पोहोचवले; मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.
त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंतिम संस्काराकरिता ‘लॉकडाऊन’अभावी त्यांच्या भावाला सुरत येथून येता आले नाही. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, भाऊ, चार मुली व एक मुलगा असा आप्त परिवार आहे. (वार्ताहर)