पुलाला कठडे नसल्यामुळे महेश नदीत पडून एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2020 10:30 AM2020-08-18T10:30:20+5:302020-08-18T10:31:09+5:30
अरुण पांडुरंग बोबडे हे रात्री कामावरून घरी जात असताना, त्यांचा अचानक तोल गेला आणि महेश नदीच्या पात्रात पडले.
बाळापूर : शहरातील ४२ वर्षीय व्यक्तीचा घरी जात असताना, रात्रीच्या वेळी तोल गेल्यामुळे नदीच्या पाण्यात पडून मृत्यू झाल्याची घटना १५ आॅगस्ट रोजी रात्री उशिरा घडली. पुलाला कठडे नसल्यामुळे अनेकदा अपघात घडतात. यातच नदीत पडून या व्यक्तीचा मृत्यू झाला.
बाळापूर शहरात अकोला नाका येथे राहणारे अरुण पांडुरंग बोबडे (४२) हे १५ आॅगस्ट रोजी रात्री कामावरून घरी जात असताना, त्यांचा अचानक तोल गेला आणि महेश नदीच्या पात्रात पडले. नदीला पाणी भरपूर असल्यामुळे त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. नदीवरील पुलावर कठडे असते तर त्यांचा जीव वाचला असता. रात्रभर अरुण बोबडे घरी परतले नसल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. १७ आॅगस्ट रोजी नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी पुलखालून त्यांचा मृतदेह बाहेर काढला. पुलावर कठडे नसल्यामुळे एका व्यक्तीला जीव गमवावा लागला. पुलावरील कठड्याला लावण्यात आलेले लोखंडी पाइप अनेकदा चोरटे चोरून नेतात. याबाबत पोलिसांसह सार्वजनिक बांधकाम विभागाकडेसुद्धा तक्रार केली आहे; परंतु तक्रारीची दखल घेण्यात आली नाही. अकोला नाका परिसरातील गजानन कोकाटे, गगन शर्मा, शेळद ग्रामपंचायतचे उपसरपंच रितेश अहिर, पंचायत समिती सदस्य मीरा बाळू हिरेकर यांनी तहसीलदारांना निवेदन देऊन पुलावरून कासारखेड, अकोला नाका परिसरातील नागरिकांची नेहमीच वर्दळ असते. या पुलावर कायमस्वरूपी कठडे बसविण्यात यावे आणि बोबडे कुटुंबीयांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी केली आहे.