एकाच दिवशी ११ शेतक-यांनी घेतला विषाचा घोट
By admin | Published: August 17, 2015 01:27 AM2015-08-17T01:27:50+5:302015-08-17T01:40:41+5:30
एकाचा मृत्यू, १0 जणांवर उपचार सुरू.
सचिन राऊत / अकोला : अस्मानी व सुलतानी संकटाने घायाळ झालेल्या अकोला, वाशिम व बुलडाणा जिल्हय़ातील तब्बल ११ शेतकर्यांनी एकाच दिवशी म्हणजे रविवारी विषाचा घोट घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली. यामधील एका शेतकर्याचा मृत्यू झाला असून, उर्वरित १0 शेतकर्यांवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सवरेपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दुबार पेरणी केल्यानंतरही पाऊस न आल्याने प्रचंड आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकर्यांनी सावरत तिबार पेरणी केली. मात्र, या पेरणीनंतर पाऊस प्रचंड प्रमाणात आल्याने अनेक शेतकर्यांची पिकं पाण्याखाली गेली. यावर शासनाकडून मदत मिळेल किंवा पीककर्जाचे पुनगर्ठन होईल, या आशेने जगत असलेल्या शेतकर्यांना पीककर्ज पुनर्गठनाचा कुठलाही आधार मिळाला नाही. त्यामुळे शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढत असून, रविवारी एकाच दिवशी ११ शेतकर्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. यामध्ये ८ शेतकरी अकोला जिल्हय़ातील असून, दोन वाशिम तर एक शेतकरी बुलडाणा जिल्हय़ातील आहे. वाशिम जिल्हय़ातील दिनकर नारायणराव भगत (४५) यांचा सवरेपचार रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर १0 शेतकर्यांवर उपचार सुरू असून, त्यामधील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.
*या शेतक-यांनी घेतले विष
गजानन मारोती भिसे (१८) रा. बाळापूर, गजानन दादाराव चौधरी (३५) रा. आकोट, सुनील हिंमतराव गोमासे (३0) रा. बोरगाव मंजू, अ. शफीक अ. रउफ (२0) रा. वाशिम, प्रतिभा नवले (२५) रा. बोरगाव मंजू, गजानन दत्तात्रय कुरडे (२५) रा. महान, मारोती सोनोने (६0) रा. बुलडाणा, मिलिंद राजू भगत (२0) रा. पिंजर, दत्ता रघुनाथ सोळंके (२४) रा. आकोट, मंगेश दिनेश चक्रनारायण (२५) रा. बोरगाव मंजू या शेतकर्यांनी विष प्राशन केले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, तर दिनकर नारायण भगत (४५) रा. वाशिम यांचा मृत्यू झाला.