जिल्ह्यातील एक हजार २४६ गुन्हेगार क्रिप्स योजनेत घेतले दत्तक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:13 AM2021-06-22T04:13:46+5:302021-06-22T04:13:46+5:30
गुन्हेगारांच्या कुटुंबातील सदस्यांना सोबत घेऊन त्यांना गुन्हे करण्यापासून रोखण्यासाठी, गुन्ह्यांना प्रतिबंध घालण्यासाठी तसेच गुन्हेगारांना गुन्हा करण्यापासून परावृत्त करण्यासाठी १५ ...
गुन्हेगारांच्या कुटुंबातील सदस्यांना सोबत घेऊन त्यांना गुन्हे करण्यापासून रोखण्यासाठी, गुन्ह्यांना प्रतिबंध घालण्यासाठी तसेच गुन्हेगारांना गुन्हा करण्यापासून परावृत्त करण्यासाठी १५ ऑगस्टपासून क्रीप्स हा उपक्रम पाेलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत विविध पाेलीस स्टेशन तसेच विविध शाखेत कार्यरत असलेल्या २९४ पाेलीस अंमलदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. या २९४ पाेलीस कर्मचाऱ्यांकडून जिल्ह्यातील सुमारे एक हजार २४७ गुन्हेगारांवर लक्ष ठेवण्यात येत आहे. या गुन्हेगारांच्या रोजच्या हालचाली पोलीस स्टेशन स्तरावर नोंद करण्यात येत आहेत. पाेलीस अधीक्षक जी. श्रीधर, अतिरिक्त पाेलीस अधीक्षक माेनिका राऊत, शहर पाेलीस उपअधीक्षक सचिन कदम, स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख शैलेष सपकाळ, विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील यांनी गुन्हेगार दत्तक याेजना राबविण्यास प्रयत्न केले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी माेठा हातभार लागला आहे.
२३ नोडल ऑफिसर नियंत्रण ठेवण्यासाठी
तसेच माहिती गाेळा करण्यासाठी २९४ अंमलदार
गुन्हेगारांवर अंकुश मिळविण्यासाठी २३ नाेडल ऑफिसरची नियुक्ती करण्यात आली आहे. २३ नाेडल ऑफिसर व २९४ पाेलीस अंमलदार यांनी जिल्ह्यातील तब्बल एक हजार २४६ गुन्हेगारांना दत्तक घेतले असून, त्यांना गुन्हे करण्यापासून राेखण्यात येत आहे. याचे सकारात्मक परिणाम होत असल्याची माहिती आहे.
अनेकांचा गुन्हेगारी सोडण्याचा प्रयत्न
हे गुन्हेगार पाेलिसांच्या मदतीने आता याेग्य कामाला लागल्याची माहिती आहे. पोलिसांनी दत्तक घेतलेल्या गुन्हेगारांनी गुन्हेगारी विश्व सोडवण्याचाही प्रयत्न केल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यामुळे गुन्हेगारांनाही कुटुंबीयांसोबत चांगले आयुष्य जगण्याची एक नवी आशा मिळाली आहे.
दत्तक घेतलेले गुन्हेगार - १२४६
नोडल अधिकारी - २३
लक्ष ठेवणारे पोलीस अंमलदार - २९४
गुन्हेगार दत्तक योजनेसाठी पोलीस अधिकारी व अंमलदार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्या माध्यमातून गुन्हेगारांना पोलीस ठाण्यात हजेरी लावावी लागते तसेच ते काय कामकाज करीत आहेत, त्यांच्या हालचालीवर संबंधित नोडल ऑफिसर, पोलीस अधिकारी व कर्मचारी लक्ष ठेवून असतात. त्यामुळे या गुन्हेगारांवर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे. काही गुन्हेगार योग्य कामाला लागल्याचे वास्तव आहे.
- जी. श्रीधर, पोलीस अधीक्षक अकोला