आलेगाव शिवारातून एक हजार लिटर दारू साठा हस्तगत
By सचिन राऊत | Published: March 30, 2024 01:24 PM2024-03-30T13:24:32+5:302024-03-30T13:24:53+5:30
स्थानिक गुन्हे शाखेची गावठी दारू अड्यांवर छापेमारी.
सचिन राऊत, अकोला : बाळापुर तालुक्यातील आलेगाव व अंधारसांगवी शेतशिवारात सुरू असलेल्या गावठी दारू अड्ड्यांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी रात्री उशिरा छापेमारी केली. या दोन ठिकाणावरून एक हजार ११० लिटर दारू साठा हस्तगत करण्यात आला आहे. या दारूची किंमत सुमारे दीड लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
आलेगाव व अंधारसांगवी परिसरात गावठी दारू अड्डे सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. यावरून पथकाने शुक्रवारी रात्री उशिरा छापेमारी केली. अंधार सांगवी येथील रहिवासी विनोद रतन जामकर वय ३० वर्ष व उकर्डा गोविंदा शिंदे वय ६२ वर्ष या दोघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून १ हजार ११० लिटरचा मोह व दारू साठा जप्त करण्यात आला आहे. या दोन्ही आरोपींना पुढील कारवाईसाठी चांणी पोलीस ठाण्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक बच्चन सिंह, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, स्थानिक गुन्हे शाखाप्रमुख शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनात पीएसआय गोपाल जाधव, रवींद्र खंडारे, महेंद्र मलिये, अविनाश पाचपोर, विशाल मोरे, अनिल राठोड, अशोक सोनवणे यांनी केली.