कोसगावच्या गावाच्या एकीने कोरोनाला वेशीवरच रोखले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:17 AM2021-04-05T04:17:29+5:302021-04-05T04:17:29+5:30
संतोष कुमार गवई पातूर : जिल्ह्यासह तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना तालुक्यातील कोसगावने कोरोनाला वेशीवरच रोखले ...
संतोष कुमार गवई
पातूर : जिल्ह्यासह तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना तालुक्यातील कोसगावने कोरोनाला वेशीवरच रोखले आहे. आजपर्यंत या गावात एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळलेला नसून, गावकऱ्यांची एकीने हे शक्य झाले आहे. यासाठी 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' उपक्रमाची मोठी मदत झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. एकीच्या जोरावर व जनजागृतीच्या आधारे संपूर्ण गाव कोरोनाच्या परिस्थितीवर मात करण्यात यशस्वी ठरले आहे.
तालुक्यातील कोसगाव हे आदीवासीबहुल असलेले गाव. गावात बहुसंख्य आदिवासी बांधव राहतात. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामस्थांनी नेहमीच्या सवयीत बदल करून नवीन जीवनशैली आत्मसात करावी लागली. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतील 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' या मोहिमेची फार मोठी मदत झाली. या मोहिमेंतर्गत ग्रामपंचायतीने गावात सर्वेक्षण, नागरिकांची कोरोनाची चाचणी, दुकानदार आदींच्या चाचंणीवर भर दिला. ग्रामस्थांसाठी एकता ही मोठी ताकद ठरली असून, त्याचा फायदा कोरोनाच्या परिस्थितीत झाला आहे. कोरोनादूत घरोघरी जाऊन सर्वेक्षण करीत होते. एखाद्या व्यक्तीला ताप, खोकला, घशात खवखवणे, थकवा, श्वास घेण्यास त्रास, अशा प्रकारचा त्रास होत आहे काय, याची त्वरित दखल घेतल्या जात होती. नागरिकांना कोरोनाविषयी माहिती देण्यात येत होती. नागरिकांच्या एकीने व कोरोनाविषयक घेतलेल्या काळजीने कोसगावाने कोरोनाला वेशीवरच रोखले आहे.
गावाची लोकसंख्या - ६५१
गावातील घरांची संख्या - १४९
---------------------------------------------
इन्फोबॉक्स -
शासकीय कर्मचारी व ग्रामस्थांची एकमेकांना साथ
लॉकडाऊन कालावधीत व त्यानंतरही कोरोनाच्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरपंच अजय नारायण राव, ग्रा.पं. सचिव रितेश पांडुरंग सवाईश्याम, माळराजुरा उपकेंद्राचे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. योगेश नानवटे, आरोग्य सेवक संजय बलरामसिंग आडे, आरोग्य सेविका एम.व्ही सिरसाट, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी प्रयत्न केले. या कठीण काळात एकमेकांची साथ असल्याने कोरोना गावात प्रवेश करू शकला नाही.
----------------------------------------------------
गावात फवारणीवर भर
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायतीने गावात फवारणी करण्यावर भर दिला. दि. १५ ऑगस्ट रोजी ग्रामस्थांना सॅनिटायझरचे मोफत वाटप करण्यात आले. तसेच कोरोनाविषयक जनजागृती करण्यात आली.
कोट - कोसगावात नेहमी एकजुटीने काम केले जाते. ग्रामपंचायतने राबवलेल्या प्रत्येक उपक्रमाला ग्रामस्थ साथ देतात. त्यामुळेच कोरोनासारख्या परिस्थितीवर आत्तापर्यंत मात करता आली.
- रितेश सवाईशाम, ग्रामसेवक, कोसगाव.
-------------------------------------------------------
कोसगावात अद्याप एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला नाही. याचे श्रेय संपूर्ण ग्रामस्थांना आहे. आदिवासीबहुल असलेल्या गावात एकमेकांची साथ मिळाल्यानेच गाव कोरोनाला वेशीवर रोखण्यात यशस्वी झाले आहे.
- अजय राव, सरपंच, कोसगाव.