धनादेश अनादरप्रकरणी आरोपीस एक वर्षाचा कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2020 02:35 PM2020-02-07T14:35:12+5:302020-02-07T14:35:16+5:30
सुनीता रमेश खानचंदानी यांच्याकडून दोषी गोविंद भानुमल चावला याने २ लाख ५० हजार रुपये २७ सप्टेंबर २००४ रोजी घेतले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : धनादेश अनादरप्रकरणी कनिष्ठ न्यायालायाने दोषीस एका वर्षाच्या कारावासाची शिक्षा ठोठावली होती. यावर आरोपीने जिल्हा व सत्र न्यायालयात धाव घेतल्यानंतर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश वाय. जी. खोब्रागडे यांच्या न्यायालयाने आरोपीस १ वर्षाच्या कारावासाची शिक्षा कायम ठेवली असून, ४ लाख ६० हजार रुपये दंडाची रक्कमही नुकसान भरपाई म्हणून देण्याचा आदेश दिला आहे. कनिष्ठ न्यायालयाचा हा निकाल जिल्हा व सत्र न्यायालयाने कायम ठेवत दोषींची याचिका फेटाळून लावली आहे.
सुनीता रमेश खानचंदानी यांच्याकडून दोषी गोविंद भानुमल चावला याने २ लाख ५० हजार रुपये २७ सप्टेंबर २००४ रोजी घेतले होते. रक्कम परत करण्यासाठी जनता कमर्शियल बँकेचा धनादेशही दिला होता; मात्र पैशाचा परतावा न केल्यामुळे सुनीता रमेश खानचंदानी यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती.
या याचिकेवर ४ आॅगस्ट २०१८ रोजी कनिष्ठ न्यायालयामध्ये सुनावणी झाली असून, न्यायालयाने दोषी आरोपीस ४ लाख ६० हजार रुपये परत करण्याचा आदेश दिला. यासोबतच आरोपीस एका वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली. हा दंड न भरल्यास अतिरिक्त ४ महिन्यांची साधी कैद, अशी शिक्षा ठोठावली होती; मात्र दोषीने प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्याकडे अपील केले होते. ही याचिका प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश वाय. जी. खोब्रागडे यांनी फेटाळून लावत कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेली शिक्षा काम ठेवली आहे.