मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस एक वर्षाचा कारावास
By सचिन राऊत | Published: July 10, 2023 05:28 PM2023-07-10T17:28:56+5:302023-07-10T17:29:04+5:30
अकोला : अकोट फाईल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी असलेल्या एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस अतिरिक्त जिल्हा व सत्र ...
अकोला : अकोट फाईल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी असलेल्या एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. जे. शर्मा यांच्या न्यायालयाने एक वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. यासोबतच चार हजार रुपये दंड ठोठावला असून दंड न भरल्यास अतिरिक्त शिक्षेचे प्रावधान न्यायालयाने केले आहे.
अकोट फैल परिसरातील रहिवासी असलेल्या एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार याच परिसरातील रहिवासी स्वप्निल बसवंत वानखडे वय ३० वर्ष हा मुलीचा पाठलाग करतो. तसेच तिला दुचाकीवर बसण्याची जबरदस्ती करतो, एवढेच नव्हे तर मोबाईलवर न बोलल्यास तोंडावर ब्लेड मारण्याची धमकी दिल्याची तक्रार या मुलीने १६ मार्च २०१८ रोजी अकोट फाईल पोलीस ठाण्यात दिली होती. यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास केला.
दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश शर्मा यांच्या न्यायालयाने सहा साक्षीदार तपासल्यानंतर आरोपी विरुद्ध आढळलेल्या ठोस पुराव्यांच्या आधारे त्याला दोषी ठरवीत भारतीय दंड विधानाच्या कलम ३५४ अन्वये एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. यासोबतच चार हजार रुपयांचा दंड ठोठावला असून दंड न भरल्यास अतिरिक्त शिक्षेचे प्रावधान केले आहे. याप्रकरणी सरकार पक्षाच्या वतीने ऍड किरण खोत, अँड दीपक गोटे यांनी कामकाज पाहिले तर या प्रकरणाचा तपास तत्कालीन पीएसआय छाया वाघ यांनी केला होता. कोर्टामध्ये पैरवी अधिकारी म्हणून अनिल धनभर व प्रिया गजानन शेगोकार यांनी कामकाज पाहिले.