विनयभंग प्रकरणातील आराेपीस एक वर्षांचा कारावास
By सचिन राऊत | Published: September 25, 2023 07:44 PM2023-09-25T19:44:50+5:302023-09-25T19:46:48+5:30
यासोबतच पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून दंड न भरल्यास एक महिन्याच्या अतिरिक्त शिक्षेचे प्रावधान न्यायालयाने केले आहे.
अकाेला : बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात रहिवासी असलेल्या विवाहितेला अश्लील बोलून तिचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस जिल्हा व सत्र न्यायाधीश सुनील पाटील यांच्या न्यायालयाने साेमवारी एक वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. यासोबतच पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून दंड न भरल्यास एक महिन्याच्या अतिरिक्त शिक्षेचे प्रावधान न्यायालयाने केले आहे.
बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या एका गावातील रहिवासी आरोपी संतोष जानराव तळाेकार वय २५ वर्ष याने गावातीलच रहिवासी असलेली एक विवाहित महिला तिच्या मुलाला शाळेतून आणण्यासाठी जात असताना आरोपीने महिलेचा हात पकडत अश्लील वर्तन केले. महिलेने विरोध केला असता त्याने धमकी दिली. या प्रकरणी महिलेने बोरगाव मंजू पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी संतोष जानराव तळाेकार याच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३५४ अन्वये गुन्हा दाखल केला. त्यानंतर या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी एन एस काळे यांनी करून दाेषाराेपपत्र न्यायालयात दाखल केले.
जिल्हा व सत्र न्यायाधीश सुनील पाटील यांच्या न्यायालयाने चार साक्षीदार तपासल्यानंतर आरोपीविरुद्ध आढळलेल्या ठाेस पुराव्यांच्या आधारे त्याला कलम ३५४ अन्वये एक वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. या प्रकरणी सरकार पक्षाच्या वतीने ऍड आनंद गोदे यांनी कामकाज पाहिले तर कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून श्रीकृष्ण पाचपाेर यांनी त्यांना सहकार्य केले.