दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेचे आॅनलाइन प्रवेशपत्र!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2019 12:46 PM2019-02-03T12:46:18+5:302019-02-03T12:46:23+5:30
अकोला: इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. दहावीच्या परीक्षेसाठी अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेचे प्रवेशपत्र (हॉलतिकीट) राज्य शिक्षण मंडळाने आॅनलाइन उपलब्ध केले आहे.
अकोला: इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. दहावीच्या परीक्षेसाठी अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेचे प्रवेशपत्र (हॉलतिकीट) राज्य शिक्षण मंडळाने आॅनलाइन उपलब्ध केले आहे. शाळेतून विद्यार्थ्यांना आॅनलाइन प्रवेशपत्र देण्यात येत आहेत. २९ जानेवारीपासून प्रवेशपत्रांचे वितरण सुरू झाले असून, ही प्रवेशपत्रे विद्यार्थ्यांना मोफत उपलब्ध करून द्यावी, त्यासाठी कोणतेही शुल्क आकारू नये, असे मंडळाने स्पष्ट केले आहे.
माध्यमिक (दहावी)ची परीक्षा १ मार्च ते २२ मार्चदरम्यान होणार आहे, तर उच्च माध्यमिक (बारावी)ची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २0 मार्च दरम्यान होणार आहे. अमरावती विभागामध्ये दहावीच्या परीक्षेला एकूण १ लाख ७२ हजार विद्यार्थी प्रविष्ट होणार आहेत. दोन्ही परीक्षांसाठी जिल्ह्यातून अंदाजे ५६ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत. त्यानुसार विभागीय शिक्षण मंडळाने विद्यार्थ्यांना आॅनलाइन हॉलतिकीट उपलब्ध करून दिले आहेत. शाळांना देण्यात आलेल्या लॉग-इन आयडी व पासवर्डच्या आधारे शाळा हॉलतिकीट डाउनलोड करू शकतील. शाळांनी इयत्ता दहावी परीक्षेची आॅनलाइन हॉलतिकिटाची प्रिंट काढून विद्यार्थ्यांना द्यावी, प्रिंटिंगसाठी विद्यार्थ्यांकडून कोणतेही शुल्क घेता येणार नाही, असेही मंडळाने बजावले आहे. शाळेने विद्यार्थ्यांना हॉलतिकिटाची प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापकांनी शिक्का मारून स्वाक्षरी करून विद्यार्थ्यांना उपलब्ध करावे, विद्यार्थ्यांकडून हॉलतिकीट गहाळ झाल्यास संबंधित माध्यमिक शाळांनी पुन्हा प्रिंट काढून त्यावर लाल शाईने द्वितीय प्रत असा शेरा देऊन विद्यार्थ्यांना हॉलतिकीट उपलब्ध करून द्यावे, हॉलतिकिटावर छायाचित्र चुकीचे असल्यास त्यावर विद्यार्थ्यांचा फोटो चिकटवून त्यावर संबंधित मुख्याध्यापकांनी शिक्का मारून स्वाक्षरी करावी आणि ते विद्यार्थ्यांना द्यावे, अशा सूचना शिक्षण मंडळाने दिल्या आहेत. (प्रतिनिधी)