ऑनलाइन एज्युकेशनने बिघडविले हस्ताक्षर अन् लिहिण्याची गती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 10:05 AM2021-03-28T10:05:59+5:302021-03-28T10:08:54+5:30
Online education डोळ्यांच्या आरोग्यासोबत आता विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर आणि लिहिण्याची गती बिघडली आहे.
अकोला : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने नाईलाजाने ऑनलाईन प्रणालीचा स्वीकार करावा लागत आहे. ऑनलाईन मोबाईल शिक्षणामुळे डोळ्यांच्या आरोग्यासोबत आता विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर आणि लिहिण्याची गती बिघडली आहे. यामुळे लेखी परीक्षेत अडचणी निर्माण होणार आहेत.
मार्च २०२० पासून कोरोनामुळे शाळा, महाविद्यालये बंद आहेत. याला पर्याय म्हणून ऑनलाईन शिक्षणावर भर दिला जात आहे; यामध्ये दीड वर्षापासून केवळ मोबाईलचा उपयोग करून ऑनलाईन शिक्षण होत आहे. लिहिण्याची सवय नसल्याने विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर कमालीचे बिघडत चालले आहेत. वळणदार हस्ताक्षर येत नसून लिहिण्याची गतीही मंदावत आहे. पालकवर्गही याकडे लक्ष द्यायला तयार नसल्याने विद्यार्थी दुर्लक्ष करीत आहेत. दहावी, बारावीच्या लेखी परीक्षा जवळ आली असून परीक्षेतील सर्व प्रश्न सोडविता येणार की नाही, याची चिंता विद्यार्थ्यांसह पालकांना लागली आहे. प्रश्न-उत्तरे व गृहपाठ लिहिण्याची सवय राहली नसल्याने लेखी परीक्षेला अडचण येणार आहे.
विद्यार्थ्यांनो हे करा!
१) विद्यार्थ्यांनी नियमित काही पाने शुद्धलेखनाचा सराव करावा.
२) पुस्तकांमधील काही उतारे वहीमध्ये लिहिल्यास हस्ताक्षरांची गती वाढण्यास मदत होईल.
३) दररोज ऑनलाईन शिक्षणामध्ये सांगितलेले लिहून घ्यावे.
मराठी विषयांचे तज्ज म्हणतात...
मूल्यमापन लेखी परीक्षेवर होत असते. लेखी पेपर सोडविण्यासाठी लेखी सराव आवश्यक असतो. तीन तासाच्या आत पेपर सोडविण्यासाठी हा सराव गरजेचा आहे. शिक्षक व शाळांनी लेखी सराव करून घेतल्यास अडचण दूर होईल.
नीलेश पाकदुणे, शिक्षक
लिहिण्याचा सराव राहिला नाही. मोबाईलमध्ये बोलून टाईप करूनच सर्व शक्य होत आहे. मुलांना हस्तांक्षरात लेखन करणे गरजेचे वाटत नाही. त्याचा परिणाम शुद्धलेखनावर होत आहे.
स्वाती दामोदरे, शिक्षिका
ऑनलाईनमुळे लिहिण्याची सवय बिघडत चालली आहे. त्यामुळे घरीच हस्ताक्षर सुधारण्याचा प्रयत्न होत आहे. मुलांचा लेखी सराव सुरू आहे.
किशोर पाटील, पालक
ऑनलाईन अभ्यासामुळे मुले लिहिण्याचा सराव विसरले आहेत. मोबाईलवर सर्व होते. लिहिण्याची गती कमी झाली आहे. त्यामुळे लेखी परीक्षेची चिंता लागली आहे.
अमोल कळंब, पालक