बार्शीटाकळी तालुका श्री गुरुदेव सेवा मंडळाची ऑनलाइन बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:18 AM2021-04-27T04:18:50+5:302021-04-27T04:18:50+5:30
अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज आश्रमअंतर्गत अकोला जिल्हा प्रचार प्रमुख डॉ. अशोक रत्नपारखी यांनी केलेल्या आवाहनानुसार वंदनीय ...
अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज आश्रमअंतर्गत अकोला जिल्हा प्रचार प्रमुख डॉ. अशोक रत्नपारखी यांनी केलेल्या आवाहनानुसार वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ३० एप्रिल २०२१ रोजी येत असलेल्या ११२ व्या जयंतीनिमित्त तालुका प्रचार प्रमुख देविदास कावरे यांनी २५ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता तालुका गुरुदेव सेवा मंडळाची ऑनलाइन बैठक आयोजित केली होती.
डॉ. अशोक रत्नपारखी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये अकोला येथील मध्यवर्ती प्रतिनिधी आर. आय. शेख गुरुजी, अकोट येथील राष्ट्रीय कीर्तनकार श्रीकृष्ण सावळे गुरुजी, राजंदा येथील कीर्तनकार जयश्री महल्ले, तालुका सेवाधिकारी संतोष सोनोने, तालुका युवक प्रमुख प्रा. डॉ. योगेश सरप, जामवसु केंद्र प्रमुख धनंजय ढोरे, पत्रकार प्रा. शाहिद इकबाल खान, वकार खान, जेठाभाई पटेल सहभागी झाले होते. बैठकीमध्ये राष्ट्रसंतांची जयंती ३० एप्रिल रोजी घराघरात, सकाळी सामूहिक ध्यान, ग्रामगीता पठण, सायंकाळी सामुदायिक प्रार्थना घेऊन भक्तिभावाने साजरी करावी, असे आवाहन श्रीकृष्ण सावळे गुरुजी यांनी केले. मागील वर्षी ३० एप्रिल २०२० रोजी तालुक्यातील असंख्य गुरुदेव सेवकांनी लोकवर्गणी करून सुमारे ४१,००० रुपये निधी मुख्यमंत्री साहाय्यता निधीमध्ये अर्पण केला होता. यावर्षी परिस्थिती गंभीर आहे. रुग्णालयामध्ये ऑक्सिजनचा तुटवडा आहे. रेमडेसिविर इंजेक्शन नाहीत. अशा परिस्थितीत गुरुदेव सेवकांनी पुढे येऊन शासनाला मदत करण्याचे आवाहन प्रा. योगेश सरप यांनी केले. राष्ट्रसंतांच्या जयंतीदिनी तरुणांनी रक्तदान शिबिर आयोजित करावे, असे मत जयश्री महल्ले यांनी मांडले.