जिल्हा परिषदेत ‘ऑनलाइन’ सभांनी गाजले सरते वर्ष!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:19 AM2020-12-31T04:19:38+5:302020-12-31T04:19:38+5:30
अकोला : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेत ‘ऑनलाइन’ सभांनी सरते वर्ष चांगलेच गाजले. त्यामध्ये अनेक मुद्द्यांवर जिल्हा परिषदेतील ...
अकोला : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेत ‘ऑनलाइन’ सभांनी सरते वर्ष चांगलेच गाजले. त्यामध्ये अनेक मुद्द्यांवर जिल्हा परिषदेतील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकारणही चांगलेच रंगल्याचे जिल्हावासीयांनी अनुभवले.
कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रित करण्यासाठी २०२० या वर्षात डिसेंबरपर्यंत जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभा आणि विविध विषय समित्यांच्या सभा ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आल्या. त्यामध्ये प्रामुख्याने १० सप्टेंबर आणि १० डिसेंबरची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्यात आलेल्या सर्वसाधारण सभा वादळी ठरल्या. या सर्वसाधारण सभांमध्ये विषयपत्रिकावरील विषयांसह वेळेवरच या विषयात मंजूर करण्यात आलेल्या ठरावांच्या मुद्द्यावर जिल्हा परिषदेतील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलेच राजकारण रंगले. ‘ऑनलाइन’'' पद्धतीने घेण्यात आलेल्या सर्वसाधारण सभांसह विषय समित्यांच्या सभांमध्ये तांत्रिक बिघाड आणि नेट कनेक्टिव्हिटीअभावी विविध प्रश्नांची मांडणी करताना जिल्हा परिषद सदस्यांना अडचणींचा सामना करावा लागला.
स्थगितीमध्ये अडकली
ठरावांची अंमलबजावणी !
जिल्हा परिषदेच्या १० सप्टेंबर रोजी घेण्यात आलेल्या सर्वसाधारण सभेत वेळेवरच्या विषयांत मंजूर करण्यात आलेल्या ठरावांना विरोध करीत विरोधी पक्ष असलेल्या शिवसेनेच्या सदस्यांनी विभागीय आयुक्तांकडे अपील दाखल केले होते. त्यानुषंगाने वेळेवर मंजूर करण्यात आलेल्या ठरावांची अंमलबजावणी करण्यास विभागीय आयुक्तांनी स्थगिती दिली होती. त्यानंतर १० डिसेंबर रोजी सर्वसाधारण सभेत अकोला व बाळापूर तालुक्यातील ६९ गावांसाठी प्रस्तावित पाणीपुरवठा योजनेचा विषय प्रलंबित ठेवण्यात आल्याने आणि वेळेवरच्या विषयात मंजूर करण्यात आलेल्या विविध अठरा ठरावांविरोधात विरोधकांनी अपील दाखल केल्याने, या ठरावांच्या अंमलबजावणीसही पुढील आदेशापर्यंत विभागीय आयुक्तांकडून स्थगिती देण्यात आली. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत वेळेवर मंजूर करण्यात आलेल्या ठरावांची अंमलबजावणी अडकली.
‘वंचित’ने राखली सत्ता!सरत्या वर्षात जानेवारीमध्ये जिल्हा परिषदेची निवडणूक घेण्यात आली. त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीने सर्वाधिक जागांवर विजय प्राप्त करून जिल्हा परिषदेतील सत्ता कायम राखली. १७ जानेवारीला जिल्हा परिषद अध्यक्षपदी प्रतिभा भोजने, तर उपाध्यक्षपदी सावित्री राठोड यांची निवड करण्यात आली. त्यानंतर सभापती म्हणून चंद्रशेखर पांडे गुरुजी, पंजाबराव वडाळ, मनीषा बोर्डे व आकाश शिरसाट यांची निवड करण्यात आली.
विकासकामांचा निधी
खर्च करण्यात अपयश!
जिल्हा परिषदअंतर्गत विविध विकासकामांचा निधी खर्च करण्यात जिल्हा परिषदेला सरत्या वर्षात अपयश आले. त्यामुळे अखर्चित राहिलेला कोट्यवधींचा निधी जिल्हा परिषदेला शासनाकडे परत करावा लागला.