विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी शाळांकडून ऑनलाइन प्रक्रिया!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2020 05:45 PM2020-04-13T17:45:38+5:302020-04-13T17:45:48+5:30
शहरातील काही इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू केली
अकोला: कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे शाळांना सुटी देण्यात आली. अंतिम सत्राच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या; परंतु आता शाळांसमोर प्रवेशाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
आरटीईच्या २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशही थांबलेले आहेत, तसेच इतर विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याच्या दृष्टिकोनातून शहरातील काही इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू केली असून, त्यासाठी व्हॉटस्अॅप, लिंकद्वारे प्रवेश प्रक्रिया राबविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
प्रशासकीय कर्मचारी शाळांमध्ये हजेरी लावत असले तरी, संचारबंदीमुळे पालक शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी पोहोचू शकत नाहीत, त्यामुळे शहरातील काही खासगी शाळांनी पालकांना व्हॉटसअॅप मॅसेजद्वारे आॅनलाइन प्रवेशासाठी लिंक पाठविण्यात आल्या आहेत. दरवर्षी पालकांना पाल्यांच्या शाळा प्रवेशाची चिंता सतावत असते. डिसेंबर, जानेवारी महिन्यापासूनच शाळांमध्ये प्रवेशाच्या प्रक्रियेला सुरुवात होते; मात्र कोरोनामुळे संचारबंदी घोषित करण्यात आल्यामुळे शाळांना सुुटी घोषित करण्यात आली, त्यामुळे शाळा बंद आहेत. दिवसागणिक परिस्थिती आणखीनच बिकट होत आहे. अशा परिस्थितीत शालेय प्रवेश प्रक्रियेमध्ये अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी काही शाळांनी आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू केली असून, आॅनलाइन भरलेले अर्ज स्वीकारून पाल्यांचे प्रवेश निश्चित करण्यात येत आहेत. आॅनलाइन अर्ज भरण्याबाबत शाळांनी पालकांना सूचना दिल्या आहेत. शाळा सुरू झाल्यानंतर अर्जानुसार पालकांसोबत संपर्क साधल्या जाणार आहे. या प्रवेश प्रक्रियेतून पूर्व प्राथमिक ते इयत्ता दहावीपर्यंतचे प्रवेश निश्चित करण्यात येतील. दरम्यान, शिक्षण संस्था संचालक डॉ. गजानन नारे यांना यासंदर्भात विचारले असता ते म्हणाले की,कोरोनामुळे शाळा बंद आहेत. त्यामुळे शालेय प्रवेशांचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहेत. पूर्व प्राथमिकचे प्रवेश थांबलेले आहेत. यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. आरटीईच्या प्रवेश प्रक्रिया आटोपल्याशिवाय इतरांना प्रवेश देता येत नाही.