आता पेन्शनर्सच बँकेला देणार जिवंत असल्याचा आॅनलाइन पुरावा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 02:23 PM2019-05-20T14:23:50+5:302019-05-20T14:23:56+5:30
अकोला : पेन्शनर्सला जीवन प्रमाण अर्थात जिवंत असल्याचा दाखला (लाइफ सर्टिफिकेट) बँकेत दरवर्षी नोव्हेंबर वा डिझेंबरमध्ये जमा करण्याची आता आवश्यकता नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : पेन्शनर्सला जीवन प्रमाण अर्थात जिवंत असल्याचा दाखला (लाइफ सर्टिफिकेट) बँकेत दरवर्षी नोव्हेंबर वा डिझेंबरमध्ये जमा करण्याची आता आवश्यकता नाही. केंद्र सरकारने पेन्शनर्ससाठी नोव्हेंबर-२०१८ मध्ये पोर्टल सुरू करून आॅनलाइन सुविधा सुरू केली आहे. त्यामुळे पेन्शनर्सची बँकेच्या वेळखाऊ कटकटीपासून मुक्तता झाली असून, त्यांना तासभर रांगेत उभेही राहावे लागणार नाही. ही सुविधा सर्वच राष्ट्रीयीकृत बँकांच्या ग्राहकांसाठी उपलब्ध झाली आहे.
पेन्शनर्सने एखाद्या सायबर कॅफेमधून पोर्टलवर क्लिक करून अंगठ्याचा ठसा, आधार क्रमांक आणि बँकेचा अकाउंट क्रमांक दिल्यानंतर त्यांच्या रजिस्टर क्रमांकावर ‘ओटीपी’ पाठविला जाईल आणि बँकेला काही सेकंदातच जीवन प्रमाणपत्र सादर होईल. त्यानंतर पेन्शनर्सचे अकाउंट अपडेट होणार आहे. ही प्रक्रिया पेन्शनर्सला दरवर्षी करावी लागणार आहे. ही सुविधा सर्व राष्ट्रीयीकृत बँकांनी सुरू केली आहे. याकरिता प्रत्येक बँकेने केंद्रीय पेन्शन प्रोसेस सेंटर (सीपीपीसी) सुरू केले आहे. भारतीय स्टेट बँक आॅफ इंडियाने देशभरात १६ ‘सीपीपीसी’ सुरू केले आहे. त्यात अकोल्याचादेखील समावेश आहे. ‘एसबीआय’सोबतच, सेंट्रल बँक, बँक आॅफ इंडियासह जवळपास सर्वच राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये ही सुविधा होत आहे. केंद्र सरकारने सुरू केलेल्या पोर्टलवर पेन्शनर्सला बँकेत न येता थेट विदेशातूनही लिंक करता येणार आहे. या प्रक्रियेला ई-केवायसी असे नाव दिले आहे.
पेन्शनर्सला ही प्रक्रिया नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात पूर्ण करायची आहे. न केल्यास जानेवारीमध्ये पेन्शन बंद होणार आहे. आॅनलाइन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर पेन्शनर्सला ओटीपी आल्यानंतर प्रक्रिया पूर्ण झाली, असे समजायचे. त्यानंतर पेन्शनर्सच्या खात्यात महिन्याची पेन्शन जमा झाल्याचा मॅसेज येणार आहे. ही प्रक्रिया अतिशय सहजरीत्या पूर्ण करता येते. प्रत्येक बँकेने पेन्शनर्ससाठी ‘सीपीपीसी’ सुरू केले आहे.
रांगेत उभे राहण्यापासून सुटका
पोलीस खात्यातून निवृत्त झालेल्या एका अधिकाऱ्यांनी सांगितले, की केंद्र सरकारने पोर्टल सुरू करून पेन्शनर्सला मोठी सोय उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे बँकेत जाणे आणि रांगेत उभे राहण्यापासून सुटका झाली आहे. नोव्हेंबरमध्ये पोर्टलवरून ई-केवायसी केले आहे. त्यामुळे अकाउंट सुरळीत झाले आहे.
सेवानिवृत्त कर्मचारी-अधिकाऱ्यांसाठी ही सुविधा सर्वोत्तम आहे. त्याचा लाभ सर्वांनी घेतला पाहिजे; मात्र अनेकदा वयानुसार बोटांचे ठसे नष्ट होतात. अशावेळी त्यांना प्रत्यक्ष आणल्याशिवाय पर्याय नाही.
-आलोककुमार तरेनिया,
एलडीएम अकोला.