प्रोत्साहन भत्त्यासाठी १४२ शाळांचे आॅनलाइन प्रस्ताव
By Admin | Published: April 10, 2017 01:19 AM2017-04-10T01:19:41+5:302017-04-10T01:19:41+5:30
विद्यार्थिनींसाठी प्रोत्साहन भत्ता : नववी ते बारावीतील विद्यार्थिनींना लाभ
अकोला : राज्य शासनाने अनुसूचित जाती, जमातीमधील विद्यार्थिनींना शिक्षण प्रवाहात आणता यावे आणि त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याच्या दृष्टिकोनातून प्रोत्साहन भत्ता योजना सुरू केली. योजनेचा लाभ घेण्यासाठी माध्यमिक शिक्षण विभागाने शाळांकडून विद्यार्थिनींच्या संख्येसह प्रस्ताव मागविले होते. जिल्ह्यातील १४२ शाळांनी प्रोत्साहन भत्त्यासाठी आॅनलाइन प्रस्ताव पाठविले आहेत. त्यापैकी ३३ शाळांचे प्रस्ताव तांत्रिक अडचणींमुळे आॅनलाइनवर अपलोड होऊ शकले नाहीत.
अनुसूचित जाती, जमातीमधील अनेक विद्यार्थिनी आर्थिक बाबींमुळे शिक्षणापासून वंचित राहतात. पालकही विद्यार्थिनींच्या शिक्षणाबाबत फारसे आग्रही नसतात. अनुसूचित जाती, जमातीमधील एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहावे नये. विद्यार्थिनींना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे. या उद्देशाने शासनाच्या शिक्षण विभागाच्या माध्यमातून वार्षिक तीन हजार रुपये प्रोत्साहन भत्ता योजना सुरू केली. येत्या २0१७ व १८ या शैक्षणिक वर्षामध्ये इयत्ता नववी ते बारावीपर्यंतचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना प्रोत्साहन भत्ता मिळावा, यासाठी माध्यमिक शिक्षण विभागाने जिल्ह्यातील शाळांकडून आॅनलाइन प्रस्ताव मागविले होते. यात विद्यार्थिनींची संख्या, त्यांचे खातेक्रमांक आणि शाळेचे नाव आदी माहिती आॅनलाइन प्रस्तावामध्ये भरण्यास सांगितले होते. त्यानुसार जिल्ह्यातील १४२ शाळांनी शिक्षण विभागाकडे प्रोत्साहन भत्त्यासाठी आॅनलाइन माहिती भरली. यापैकी ३३ शाळांमध्ये प्रस्ताव तांत्रिक अडचणींमुळे अपलोड होऊ शकले नाहीत. हे प्रस्तावसुद्धा लवकरच अपलोड होतील आणि येत्या शैक्षणिक वर्षामध्ये विद्यार्थिनींच्या बँक खात्यात थेट प्रोत्साहन भत्ता जमा होईल. पालकांनीसुद्धा शाळांकडे प्रोत्साहन भत्त्यासाठी आग्रह धरावा आणि त्याचा लाभ घ्यावा.