‘पॉलिटेक्निक’साठी २३ जुलैपर्यंत ऑनलाइन नोंदणी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:13 AM2021-07-03T04:13:21+5:302021-07-03T04:13:21+5:30
दहावीच्या विद्यार्थ्यांना केवळ परीक्षेतील आसन क्रमांक आणि विहित शुल्क भरून अर्ज करता येणार असल्याचे तंत्रशिक्षण संचालनालयाकडून सांगण्यात आले आहे. ...
दहावीच्या विद्यार्थ्यांना केवळ परीक्षेतील आसन क्रमांक आणि विहित शुल्क भरून अर्ज करता येणार असल्याचे तंत्रशिक्षण संचालनालयाकडून
सांगण्यात आले आहे. दहावीतील विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर झाल्यानंतर त्यांचे गुण थेट प्रवेश अर्जात घेण्यात येणार असल्याचे 'डीटीई ने स्पष्ट केले आहे. ‘डीटीई’ चे संचालक डॉ. अभय वाघ यांनी डिप्लोमा प्रवेश प्रक्रियेचे माहिती देणारे परिपत्रक प्रसिद्ध केले आहे, त्यानुसार खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ४०० रुपये शुल्क, तर राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ३०० रुपये शुल्क भरून अर्ज भरावा लागणार आहे. प्रवेशासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची पडताळणी करणे तसेच अर्जाची निश्चिती करणे यासाठी २३ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे. प्रवेश प्रक्रियेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांची तात्पुरती गुणवत्ता
यादी २६ जुलै रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. यादीबाबतचे आक्षेप विद्यार्थ्यांना २७ ते २९ जुलै या कालावधीत नोंदविता येतील. त्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी ३१ जुलै रोजी प्रकाशित करण्यात येईल. नंतर प्रत्यक्ष प्रवेश फेरींना सुरुवात होणार आहे. सरकारी आणि खासगी संस्थांमध्ये साधारण १ लाख ६ हजार जागा उपलब्ध आहे. अकोला जिल्ह्यातील शासकीय तंत्रनिकेतन, मूर्तिजापूर येथे सुद्धा प्रवेश प्रक्रियेची सुरुवात झालेली असून, यंत्र, विद्युत, स्थापत्य, संगणक व माहिती तंत्रज्ञान या पदविका अभियांत्रिकी शाखेसाठी प्रवेश अर्ज भरणे सुरू आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, अशी माहिती संस्थेचे प्राचार्य डॉ. अरुण गुल्हाणे यांनी दिली.