शिष्यवृत्तीच्या ‘ऑनलाइन ’ अर्जांत ‘ऑफलाइन’ चा वांधा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 07:31 PM2017-11-13T19:31:44+5:302017-11-13T19:32:39+5:30
मॅट्रिकेतर शिष्यवृत्तीसाठी ‘ऑनलाइन’ अर्ज भरण्याकरिता विद्यार्थ्यांची लगबग सुरू आहे; मात्र ‘डीबीटी पोर्टल’वर ऑनलाइन अर्ज भरताना ‘नेट कनेक्टीव्हीटी’ अभावी विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
संतोष येलकर
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : मॅट्रिकेतर शिष्यवृत्तीसाठी ‘ऑनलाइन’ अर्ज भरण्याकरिता विद्यार्थ्यांची लगबग सुरू आहे; मात्र ‘डीबीटी पोर्टल’वर ऑनलाइन अर्ज भरताना ‘नेट कनेक्टीव्हीटी’ अभावी विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. शिष्यवृत्तीचे ‘ऑनलाइन ’अर्ज भरताना ‘पोर्टल ऑफलाइन ’चा वांधा निर्माण होत असल्याने, अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांना नाहक हेलपाटे सहन करावे लागत आहेत.
अनुसूचित जाती, विमुक्त जाती-भटक्या जमाती, इतर मागासवर्ग प्रवर्ग व विशेष मागासवर्ग प्रवर्गातील विद्यार्थ्यांना इयत्ता अकरावी ते पदव्युतर शिक्षणासाठी शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत ‘मॅट्रिकेतर ’ शिष्यवृत्ती दिली जाते. यावर्षीच्या शैक्षणिक सत्रात मॅट्रिकेतर शिष्यवृत्तीसाठी शासनाच्या ‘डीबीटी पोर्टल’वर ऑनलाइन अर्ज भरण्याकरिता विद्यार्थ्यांची लगबग सुरू आहे; परंतु ऑनलाइन अर्ज भरताना ‘नेट कनेक्टीव्हीटी ’ अभावी ‘डीबीटी पोर्टल’ वारंवार बंद पडत असून, ‘एरर’ येत आहे. शिष्यवृत्तीचे ऑनलाइन अर्ज भरताना ‘डीबीटी पोर्टल’ वारंवार ‘ऑफलाइन’ होत असल्याने, ऑनलाइन अर्ज भरताना विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांना नाहक हेलपाटे सहन करावे लागत आहेत.
जिल्ह्यात ४0 हजार विद्यार्थ्यांचे अर्ज प्रस्तावित!
मॅट्रिकेतर शिष्यवृत्तीसाठी चालू शैक्षणिक सत्रात अकोला जिल्ह्यातील ४0 हजार विद्यार्थ्यांंचे ऑनलाइन अर्ज भरण्याचे प्रस्तावित आहे; परंतु सामाजिक न्याय विभागाच्या सहाय्यक आयुक्त कार्यालयाला ‘डीबीटी पोर्टल’चा ‘यूजर आयडी’ आणि ‘पासवर्ड ’ अद्याप मिळाला नसल्याने, शिष्यवृत्तीसाठी जिल्ह्यातील प्रस्तावित विद्यार्थ्यांपैकी किती विद्यार्थ्यांंनी आतापर्यंंत ऑनलाईन अर्ज सादर केले, याबाबतची माहिती या कार्यालयाकडे उपलब्ध नसल्याची स्थिती आहे.
‘यूजर आयडी, पासवर्ड’ नसल्याने, सामाजिक न्याय विभागाकडे नाही माहिती !
‘डीबीटी पोर्टल’चा ‘यूजर आयडी’ आणि ‘पासवर्ड ’ सामाजिक न्याय विभागाच्या अकोल्यातील सहायक आयुक्त कार्यालयाला अद्याप शासनाच्या महा-आयटी विभागाकडून प्राप्त झाला नाही. त्यामुळे मॅट्रिकोतर शिष्यवृत्तीसाठी आतापर्यंंत जिल्ह्यातील किती विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज दाखल केले, किती विद्यार्थ्यांंचे अर्ज राहिले, अर्जातील त्रुटी, शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेले विद्यार्थी इत्यादी प्रकारची माहिती सामाजिक न्याय विभागाच्या सहायक आयुक्त कार्यालयाकडे अद्याप उपलब्ध नाही.
मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीसाठी ‘डीबीटी पोर्टल’वर ऑनलाईन अर्ज भरताना नेट कनेक्टीव्हीअभावी पोर्टल वारंवार बंद पडत असल्याने ऑनलाईन अर्ज भरताना अडचणी येत असल्याच्या तक्रारी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांंकडून प्राप्त होत आहेत. यासंदर्भात सामाजिक न्याय विभागाच्या आयुक्तांकडे पत्राव्दारे माहिती देवून, अडचणी दूर करण्याची मागणी करण्यात आली आहे.
- अमोल यावलीकर
सहाय्यक आयुक्त, सामाजिक न्याय विभाग,अकोला.