‘नवोदय’च्या विद्यार्थी संसद निवडणुकीत ऑनलाइन मतदान

By admin | Published: August 21, 2015 10:59 PM2015-08-21T22:59:57+5:302015-08-21T22:59:57+5:30

शालेय मंत्रिमंडळ; निवडणूक कार्यक्रम जाहीर, आचारसंहिता लागू.

Online voting in Navodaya Students' Parliament elections | ‘नवोदय’च्या विद्यार्थी संसद निवडणुकीत ऑनलाइन मतदान

‘नवोदय’च्या विद्यार्थी संसद निवडणुकीत ऑनलाइन मतदान

Next

संतोष येलकर/अकोला: शालेय जीवनात विद्यार्थ्यांंना लोकशाहीचे प्रत्यक्ष धडे देण्यासाठी अकोला शहराजवळील बाभुळगावच्या नवोदय विद्यालयात विद्यार्थी संसद (शालेय मंत्रिमंडळ) गठित करण्यात येत आहे. त्यासाठी घेण्यात येत असलेल्या निवडणुकीचा कार्यक्रम शुक्रवार, २१ ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात आला असून, आचारसंहिताही लागू करण्यात आली आहे. नवोदयमध्ये अशा प्रकारचा उपक्रम राज्यात सर्वप्रथम अकोल्यात राबविला जात असून, या निवडणुकीसाठी ऑनलाइन पद्धतीने मतदान घेण्यात येणार आहे. बाभुळगाव येथे प्रज्ञावंत विद्यार्थ्यांचे नवोदय विद्यालय आहे. विद्यार्थ्यांंना शालेय जीवनात लोकशाही प्रणालीचे प्रत्यक्षात धडे देण्यासाठी आणि त्यांच्यात राजकीय इच्छाशक्ती निर्माण करण्याकरिता जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या संकल्पनेतून नवोदय विद्यालयात विद्यार्थी संसद (शालेय मंत्रिमंडळ) गठित करण्यात येत आहे. नवोदय विद्यालयात विद्यार्थी संसद गठित करण्याचा हा प्रयोग राज्यात पहिल्यांदाच अकोल्यात राबविण्यात येत आहे. विद्यार्थी संसद गठित करण्यासाठी निवडणूक घेण्यात येत असून, या निवडणुकीचा कार्यक्रम अकोल्याचे उपविभागीय अधिकारी तथा या निवडणुकीचे उपायुक्त संजय खडसे यांनी २१ ऑगस्ट रोजी नवोदय विद्यालयात जाहीर केला. निवडणुकीची आचारसंहितादेखील यावेळी लागू करण्यात आली. निवडणूक प्रक्रियेत १४ विद्यार्थी प्रतिनिधी व १४ विद्यार्थिनी प्रतिनिधींची निवड करण्यात येणार आहे. निवडून आलेल्या प्रतिनिधींमधून विद्यालय मुखमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची निवड करण्यात येणार असून, सभागृह चालविण्यासाठी सभापती तसेच स्वच्छतामंत्री, पर्यावरणमंत्री, शालेय शिक्षणमंत्री, वसतिगृह मंत्री, शालेय शिक्षण व्यवस्थापनमंत्री, विविध कार्यक्रममंत्री, विद्यार्थी संसद कामकाजमंत्री, आहारमंत्री, आरोग्यमंत्री व क्रीडामंत्री इत्यादी दहा मंत्र्यांची निवड करण्यात येणार आहे. या निवडणुकीसाठी २६ ऑगस्ट रोजी मतदान घेण्यात येणार आहे. त्यामध्ये विद्यालयातील विद्यार्थी मतदारांचे ऑनलाईन पद्धतीने मतदान घेण्यात येणार आहे. संगणकाद्वारे ऑनलाईन मतदान घेण्याची तयारी प्रशासनामार्फत करण्यात आली आहे.

*असा आहे निवडणूक कार्यक्रम!

         नवोदय विद्यालयात विद्यार्थी संसद निवडणुकीसाठी २१ ऑगस्ट रोजी अधिसूचना जाहीर करण्यात आली. २१ आणि २२ ऑगस्ट रोजी दुपारी ४ ते ५ वाजेपर्यंंत नामनिर्देशनपत्रे दाखल करता येतील. २३ ऑगस्ट रोजी ११ वाजता नामनिर्देशनपत्रांची छाननी होणार असून, त्याच दिवशी दुपारी ४ वाजेपर्यंंत नामनिर्देशपत्र मागे घेण्याची मुदत राहील. त्याच दिवशी निवडणूक लढविणार्‍या उमेदवार विद्यार्थ्यांंना चिन्हांचे वाटप करण्यात येणार असून, २४ व २५ ऑगस्ट असे दोन दिवस निवडणूक प्रचाराचा कालावधी आहे. २६ ऑगस्ट रोजी सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंंत मतदान घेण्यात येणार असून, त्याच दिवशी दुपारी ३ वाजता मतमोजणी व निवडणुकीचे निकाल जाहीर करण्यात येणार आहेत. या निवडणूक प्रक्रियेसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नायब तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांची तर नियंत्रण अधिकारी म्हणून अकोला तहसीलदार संतोष शिंदे यांची नेमणूक करण्यात आली आहे.

Web Title: Online voting in Navodaya Students' Parliament elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.