केवळ १८४ शेतकऱ्यांना १० हजार रुपये कर्जाचा लाभ!

By admin | Published: July 11, 2017 01:31 AM2017-07-11T01:31:03+5:302017-07-11T01:35:13+5:30

तातडीच्या कर्ज वाटपाचा बोजवारा : राष्ट्रीयीकृत बँकांची कर्ज वाटपाकडे पाठ

Only 184 farmers benefit from 10 thousand rupees! | केवळ १८४ शेतकऱ्यांना १० हजार रुपये कर्जाचा लाभ!

केवळ १८४ शेतकऱ्यांना १० हजार रुपये कर्जाचा लाभ!

Next

संतोष येलकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: जिल्ह्यात ८ जुलैपर्यंत केवळ १८४ शेतकऱ्यांना १० हजार रुपयांपर्यंत तातडीच्या कर्ज वाटपाचा लाभ देण्यात आला. त्यामुळे कर्जमाफीच्या घोषणेनंतर, खरीप पेरणीकरिता बियाणे व खते खरेदीचा खर्च भागविण्यासाठी थकबाकीदार शेतकऱ्यांना १० हजार रुपयांपर्यंत तातडीचे कर्ज वाटपाचा बोजवारा उडाल्याचे वास्तव समोर आले आहे.
३० जून २०१६ पर्यंत थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांना सरसकट दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्यात येत असल्याचा निर्णय शासनामार्फत गत २८ जून रोजी काढण्यात आला. त्यापूर्वी थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केल्यानंतर, थकबाकीदार शेतकऱ्यांना यावर्षीच्या खरीप हंगामातील पेरणीसाठी निविष्ठा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने १० हजार रुपयांच्या मर्यादेपर्यंत तातडीने कर्ज देण्याचे आदेश शासनामार्फत गत १४ जून रोजी देण्यात आले. त्यानुसार ३० जून २०१६ पर्यंत जिल्ह्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांना मागणीनुसार १० हजार रुपयांपर्यंत तातडीने कर्ज उपलब्ध करून देण्याचे निर्देश जिल्हा उपनिबंधकांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकांना गत १६ जून रोजी दिले.
त्यानंतर ८ जुलैपर्यंत जिल्ह्यातील केवळ १८४ थकबाकीदार शेतकऱ्यांना प्रत्येकी १० हजार रुपयांपर्यंतचे कर्ज बँकांकडून वाटप करण्यात आले. जिल्ह्यातील खरीप पेरण्या ४५ टक्के आटोपल्या असून, केवळ १८४ थकबाकीदार शेतकऱ्यांना तातडीचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे खरीप पेरणीकरिता बियाणे व खते खरेदीसाठी थकबाकीदार शेतकऱ्यांना तातडीचे १० हजार रुपयांपर्यंत कर्ज वाटप करण्याच्या योजनेचा जिल्ह्यात बोजवारा उडाल्याचे वास्तव समोर येत आहे.

राष्ट्रीयीकृत बँकांचे कर्ज वाटप ‘झीरो’!
८ जुलैपर्यंत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि ग्रामीण बँकेमार्फत जिल्ह्यात १८४ थकबाकीदार शेतकऱ्यांना १८ लाख ४० हजार रुपयांचे तातडीचे कर्ज वाटप करण्यात आले असून, जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत बँकांकडून मात्र अद्याप एकाही थकबाकीदार शेतकऱ्याला तातडीचे कर्ज वाटप करण्यात आले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना १० हजार रुपयांपर्यंत तातडीचे कर्ज वाटप करण्याचे जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकांचे प्रमाण ‘झीरो ’ आहे.

शासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांना १० हजार रुपयांपर्यंत तातडीचे कर्ज उपलब्ध करून देण्याचे निर्देश बँकांना देण्यात आले. त्यामध्ये ८ जुलैपर्यंत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून १३३ शेतकऱ्यांना १३ लाख ३० हजार रुपये आणि ग्रामीण बँकेकडून ५१ शेतकऱ्यांना ५ लाख १० हजार रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले.
- जी.जी. मावळे, जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था)

Web Title: Only 184 farmers benefit from 10 thousand rupees!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.