केवळ ३ लाख क्विंटल ‘सोयाबीन’चेच प्रमाणीकरण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2020 10:12 AM2020-06-26T10:12:29+5:302020-06-26T10:12:42+5:30

४.२५ लाख क्विंटल सोयाबीन बियाण्यांचे नियोजन केले होते; मात्र प्रत्यक्षात केवळ ३ लाख क्विंटल बियाण्यांनाच प्रमाणीकरण मिळाले.

Only 3 lakh quintals of soybean certified! | केवळ ३ लाख क्विंटल ‘सोयाबीन’चेच प्रमाणीकरण!

केवळ ३ लाख क्विंटल ‘सोयाबीन’चेच प्रमाणीकरण!

Next

- प्रवीण खेते 
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : महाराष्ट्र (महाबीज) राज्य बियाणे महामंडळाने यावर्षीच्या खरीप हंगामासाठी ४.२५ लाख क्विंटल सोयाबीन बियाण्यांचे नियोजन केले होते; मात्र प्रत्यक्षात केवळ ३ लाख क्विंटल बियाण्यांनाच प्रमाणीकरण मिळाले. परिणामी यंदा महाबीज नियोजित उद्दिष्टपूर्ती करू शकले नाही. दुसरीकडे बियाणे न उगवल्याच्या तक्रारी येऊ लागल्याने महाबीजला बियाण्यांच्या तुटवड्यालाही सामोरे जावे लागत आहे.
राज्यात खरीप हंगामासाठी जवळपास ७ ते ८ लाख क्विंटल सोयाबीन बियाण्यांची आवश्यकता भासते. या बियाण्यांच्या पुरवठ्यामध्ये अर्धा वाटा हा महाबीजचा असतो. त्यानुसार, यंदा महाबीजने ४.२५ लाख क्विंटल सोयाबीन बियाण्यांचे नियोजन केले होते. त्यानुसार, महाबीजने राज्याबाहेरदेखील बीजोत्पादन कार्यक्रम घेतल्याने महाबीजकडे कच्चा माल उपलब्ध होता. लॉकडाऊनच्या काळात नागपूर येथील बियाणे प्रक्रिया केंद्र बंद होते; मात्र चिखली, वाशिम, अकोला आणि हिंगोली येथील बियाणे प्रक्रियेचे काम सुरू होते. बियाणे प्रक्रिया झाल्यानंतर शासनाकडून प्रमाणपत्र घ्यावे लागते. तसेच पीक प्रात्याक्षिक घेतल्यानंतरच ते बियाणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचते. त्यानुसार, यंदा विक्रमी बीजोत्पादन करूनही केवळ ३ लाख क्विंटल बियाण्यांना प्रमाणीकरण मिळाल्याने एकूण उद्दिष्टामध्ये १.२५ लाख क्विंटलची तूट पडली. अशातच राज्यातील अनेक भागात पेरणीनंतर सोयाबीनचे बियाणे उगवले नसल्याच्याही तक्रारी येऊ लागल्या. त्यामुळे अहवालाची प्रतीक्षा न करता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना बियाणे वाटपाचे निर्देश शासनाने महाबीजला दिले. सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा असताना शेतकºयांना बियाणे वाटपाचे मोठे आव्हान महाबीजपुढे आहे.


गतवर्षीच्या पुराचा फटका!
गतवर्षी राज्यात झालेल्या दमदार पावसामुळे अनेक भागात पूर परिस्थिती होती. बीजोत्पादनासाठी साठवलेले सोयाबीनचे बियाणे पावसात भिजल्याने यंदा महाबीजला मोठा फटका बसल्याची माहिती आहे.


दोन लाख क्विंटल बियाणे नापास!
यंदा महाबीजने उद्दिष्टपूर्तीसाठी राज्याबाहेरही बीजोत्पादन कार्यक्रम घेतले. त्यानंतर लॉकडाऊनच्या काळातही बियाणे प्रक्रिया करून तब्बल ५ लाख ६३ हजार बियाण्यांचे उत्पादन घेत ते महाराष्ट्र बीज प्रमाणीकरण यंत्रणेकडे पाठविले; मात्र त्यापैकी केवळ ३ लाख बियाण्यांना प्रमाणपत्र मिळाले. तर दोन लाख ६३ हजार क्विंटल बियाणे प्रमाणीकरणात नापास झाल्याने महाबीजला मोठा फटका बसल्याची माहिती आहे.


यंदाच्या खरीप हंगामासाठी ४.२५ लाख क्विंटल सोयाबीन बियाणांचे उद्दिष्ट ठेवले होते; मात्र गतवर्षी आलेल्या पुरामध्ये अनेक ठिकाणी बियाणे पाण्यात भिजल्याने त्याचा फटका यंदा बसला.
- अनिल भंडारी, व्यवस्थापकीय संचालक, महाबीज, अकोला

 

Web Title: Only 3 lakh quintals of soybean certified!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.