काटेपूर्णा धरणात ३.३१ टक्केच साठा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 12:30 PM2019-07-24T12:30:38+5:302019-07-24T12:30:44+5:30
अकोला: अकोला शहराची जीवनरेखा काटेपूर्णा धरणात केवळ ३.३१ टक्केच जलसाठा शिल्लक असून, जिवंत जलसाठ्यात वेगाने घट होत असल्याने नागरिकांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: अकोला शहराची जीवनरेखा काटेपूर्णा धरणात केवळ ३.३१ टक्केच जलसाठा शिल्लक असून, जिवंत जलसाठ्यात वेगाने घट होत असल्याने नागरिकांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.
अकोला जिल्ह्यात काटेपूर्णा हे एकमेव मोठे धरण असून, या धरणाच्या पाण्यावर ८ लाख अकोलेकरांची तहान भागविली जाते; पण मागील वर्षी पूरक पाऊस न झाल्याने या धरणात अल्प जलसाठा संचयित झाला. यावषीही अर्धा पावसाळा संपला तरी अद्याप पूरक पाऊस झाला नसल्याने धरणांतील जलसाठ्याची पातळी खालावल्याने पाणीटंचाईचे संकट अधिक गंभीर झाले आहे. उन्हाचा कडाकाही ३४ ते ३७ अंशांपर्यंत पोहोचल्याने पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होत असल्याने धरणातील जलसाठ्यात वेगाने घट होत आहे. यावर्षी बऱ्यापैकी पाऊस होण्याची शक्यता हवामान शास्त्र विभागाने वर्तविली होती. तथापि, पावसाळ््याचे दोन महिने संपूनही काटेपूर्णा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाला नसल्याने धरणात पिण्यासाठी पूरक जलसाठा उपलब्ध झाला नाही. तर पातूर तालुक्यातील निर्गुणा व मूर्तिजापूर तालुक्यातील उमा धरणात शून्य टक्केच जलसाठा आहे. याच तालुक्यातील घुंगशी बॅरेजमध्ये केवळ ०.३१ टक्के म्हणजे शून्य टक्केच जलसाठा शिल्लक आहे. पातूर तालुक्यातील मोर्णा धरणात १०.४४ टक्के साठा आहे. तेल्हारा तालुक्यातीन वान धरणातही २५.१९ टक्केच साठा शिल्लक आहे.
महापालिकेने पाण्याचे नियोजन केले आहे. पाच दिवसांनी एकदा पाणीपुरवठा करण्यात येतो. पाऊस जर लांबला तर मात्र पुन्हा पुनर्नियोजन करावे लागणार असल्याचे संकेत आहे; पण पाऊस येईल, धरण पाण्याने भरेल, अशी सर्वांना अपेक्षा आहे.
मृत जलसाठा११ दलघमी!
- या धरणात ११ दशलक्ष घनमीटर मृत जलसाठा आहे. असे असले, तरी अर्ध्यापेक्षा जास्त त्यामध्ये गाळ आहे.
- सध्या उपलब्ध जिवंत जलसाठा जुलै महिना पार करेल. त्यानंतर मात्र मृत जलसाठा उपसावा लागणार.
- यासाठीची तयारी महापालिका प्रशासनाने करण्याची गरज आहे.
काटेपूर्णा धरणात उपलब्ध जलसाठ्याचे व्यवस्थित नियोजन केल्यास हा जलसाठा आणखी ३५ ते ४५ दिवस पुरू शकतो.
- चिन्मय वाकोडे, कार्यकारी अभियंता,पाटबंधारे विभाग, अकोला.