एक वर्षाच्या कालावधीत कॅनॉलची केवळ ४० टक्के मोजणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 12:58 PM2019-02-25T12:58:05+5:302019-02-25T12:58:15+5:30
अकोला: जुने शहरातील डाबकी रोड ते राष्ट्रीय महामार्गावरील नवीन किराणा बाजारपर्यंत ३ हजार ४०० मीटर लांबीच्या कॅनॉल रस्त्याच्या शासकीय मोजणीला ग्रहण लागले आहे
- आशिष गावंडे
अकोला: जुने शहरातील डाबकी रोड ते राष्ट्रीय महामार्गावरील नवीन किराणा बाजारपर्यंत ३ हजार ४०० मीटर लांबीच्या कॅनॉल रस्त्याच्या शासकीय मोजणीला ग्रहण लागले आहे. भूमी अभिलेख विभागाने कॅनॉलच्या मोजणीला मार्च २०१८ मध्ये सुरुवात केली होती. या मोजणी प्रक्रियेला येत्या १२ मार्च रोजी एक वर्षाचा कालावधी पूर्ण होत असला तरी अद्यापपर्यंत केवळ ४० टक्के मोजणी झाल्याची माहिती आहे. हा प्रकार पाहता भूमी अभिलेख विभागाकडून महापालिकेच्या हातावर तुरी दिल्या जात असताना सत्ताधारी भाजपसह प्रशासनाने बघ्याची भूमिका घेतल्याचे चित्र दिसून येत आहे. सत्तापक्ष भाजपच्या उदासीन धोरणामुळे जुने शहरवासीयांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
जुने शहरातील डाबकी रोड, किल्ला चौक ते जुना बाळापूर नाका, किल्ला चौक ते हरिहरपेठ ते वाशिम बायपास आदी प्रमुख मार्गांवर वाहतुकीचा ताण वाढला आहे. हा ताण कमी करण्यासाठी जुने शहरात विविध भागात पर्यायी प्रशस्त रस्ते निर्माण करण्याची आवश्यकता आहे. त्याकरिता डाबकी रोड ते जुना बाळापूर नाका ते थेट राष्ट्रीय महामार्गावरील नवीन किराणा मार्केटपर्यंतच्या कॅनॉल रोडचा पर्याय उपलब्ध आहे. मनपा प्रशासनाच्या पत्रानुसार महसूल यंत्रणेने सातबाऱ्याच्या फेरफार नोंदीचे काम पूर्ण केले. सात बाराच्या माध्यमातून ही जमीन शासन दरबारी जमा झाल्याचा अहवाल महापालिका प्रशासनाला प्राप्त झाल्यानंतर कॅनॉलच्या शासकीय मोजणीसाठी मनपा प्रशासनाने जानेवारी २०१८ मध्ये भूमी अभिलेख विभागाकडे ७ लाख ८४ हजार रुपये शुल्क जमा केले. त्यानंतर भूमी अभिलेख विभागाने १२ मार्च २०१८ पासून कॅनॉलची मोजणी करण्यासाठी पावले उचलली होती. येत्या १२ मार्च रोजी कॅनॉलच्या मोजणी प्रक्रियेला एक वर्षाचा कालावधी होत असतानाच भूमी अभिलेख विभागाकडून आजपर्यंत केवळ ४० टक्के जमीन व परिसराची मोजणी झाल्याची माहिती आहे.
मनपाला दिले होते पत्र
मनपा प्रशासनाने भूमी अभिलेख विभागाकडे कॅनॉलच्या मोजणीसाठी तातडीचे शुल्क जमा केल्यानंतर १२ मार्चपासून जागेच्या शासकीय मोजणी प्रक्रियेला सुरुवात केली जाणार असल्याचे पत्र मनपाला प्राप्त झाले होते. त्यानुषंगाने मनपाच्या नगररचना विभागाने या भागातील रहिवाशांना सूचना दिली होती. संत गोरोबा मंदिर परिसरातून मोजणीला सुरुवात झाल्यानंतर अवघ्या २० दिवसांत मोजणीला खीळ बसल्याचे चित्र दिसून आले.
डाबकी रोडवर वाहतुकीची कोंडी
जुने शहरातील सर्वाधिक वर्दळीचा रस्ता असलेल्या डाबकी रोड परिसरात शाळा, महाविद्यालये, कॉन्व्हेंट, खासगी शिकवणी वर्गांची मोठी संख्या असल्याने दिवसभर विद्यार्थ्यांची गर्दी दिसून येते. कस्तुरबा गांधी चौक ते जुना जकात नाक्यापर्यंतचा रस्ता अतिशय अरुंद असल्याने या रस्त्यावर दिवसभर वाहतुकीची कोंडी असल्याचे चित्र असून, वाहनधारकांचा जीव मेटाकुटीला आला आहे.
जुने शहराच्या विकासाकडे दुर्लक्ष का?
भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला म्हणून जुने शहराकडे पाहिल्या जाते. अकोला पूर्व व अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या सीमारेषेवर कॅनॉल असून, या भागातील मतदारांनी भाजपच्या पारड्यात मतांचे भरभरून दान दिले आहे. अकोला पूर्व मतदारसंघात समावेश असणाºया प्रभाग क्रमांक ८ व अकोला पश्चिम मतदार संघातील प्रभाग क्रमांक १० व १७ मधील कॅनॉल रस्त्याचे भिजत घोंगडे कायम आहे. गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत सत्ता असणाºया भाजपच्या कार्यकाळात जुने शहराच्या विकासाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे.
कॅनॉलसाठी पाठपुरावा नाहीच!
रामदासपेठ भागात सांस्कृतिक भवन, जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेच्या जागेवर मनपाची नवीन प्रशासकीय इमारत, जनता भाजी बाजार तसेच जुने बसस्थानकाच्या जागेवर कमर्शियल कॉम्प्लेक्स व गांधी-जवाहर बागेलगतच्या मैदानावर आॅडीटेरिअम हॉलचे निर्माण करण्यासाठी धावपळ करणाºया सत्ताधारी भाजपच्या पदाधिकाºयांनी कॅनॉलसाठी पाठपुरावा केल्याचे दिसून येत नाही. त्यामुळेच मागील वर्षभरापासून भूमी अभिलेख विभागाने मोजणीसाठी सत्ताधाºयांंसह प्रशासनाला झुलवत ठेवल्याचे चित्र समोर आले आहे.