रोहनखेड येथे सहा एकरात केवळ ७५ किलो उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:22 AM2021-09-22T04:22:17+5:302021-09-22T04:22:17+5:30

रोहनखेड: यंदा अतिपाऊस व ढगफुटी सदृश पावसामुळे अकोट तालुक्यातील खारपाणपट्ट्यात येत असलेल्या रोहनखेड परिसरात मूग उत्पादक शेतकऱ्यांना चांगलाच फटका ...

Only 75 kg production in six acres at Rohankhed | रोहनखेड येथे सहा एकरात केवळ ७५ किलो उत्पादन

रोहनखेड येथे सहा एकरात केवळ ७५ किलो उत्पादन

Next

रोहनखेड: यंदा अतिपाऊस व ढगफुटी सदृश पावसामुळे अकोट तालुक्यातील खारपाणपट्ट्यात येत असलेल्या रोहनखेड परिसरात मूग उत्पादक शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसला आहे. येथील एका शेतकऱ्याला सहा एकरात केवळ ७५ किलोच उत्पादन झाले असून, शेतकऱ्याचा लागवडीचा खर्चही वसूल झाला नाही. त्यामुळे या भागात सर्व्हे करून पीक विम्याची मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

यंदा परिसरात सुरुवातीला चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी मृग नक्षत्रातच पेरणी आटोपली. त्यानंतर पावसाने दडी दिल्याने पिके कोमेजण्याच्या मार्गावर होते. पावसाने दमदार हजेरी लावल्याने पुन्हा शेतात पिके बहरली होती. पिके फुलोरा अवस्थेत असताना धुवारीमुळे फूलझळ झाल्याने मुगाच्या पिकाला शेंगाच लागल्या नसल्याचे दिसून आले. तसेच वातावरणातील बदलांमुळे अज्ञात रोगांचा प्रादुर्भाव यामुळे रोहनखेड परिसरासह पुंडा, बांबर्डा, कुटासा, कवठा बु. या शिवारात मूग पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी कीटकनाशकाची महागडी फवारणी केली मात्र तरीही उपयोग झाला नसल्याचे चित्र आहे.

-------------------

मुगाला आले होते कोंब

रोहनखेडसह पुंडा, बांबर्डा, कुटासा, कवठा बु. शिवारातील शेतकऱ्यांनी यंदा मुगाला पसंती देत मोठ्या प्रमाणात पेरणी केली होती. मात्र अतिपावसामुळे या शिवारात मुगाला कोंब फुटल्याचे दिसून आले. काही शेतकऱ्यांनी जुलै महिन्यातच पिकावर ट्रॅक्टर फिरवला असल्याचे वास्तव आहे. सद्यस्थितीत मूग तोडणी आटोपली असून, अत्यल्प उत्पादन होत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

---------------------------------

खर्च ४० हजार ; शेतकरी आर्थिक संकटात

येथील भुजंगराव जगतराव झामरे यांनी सहा एकरात मुगाची पेरणी केली. यासाठी त्यांना जवळपास ४० हजार रुपयांपर्यंत खर्च आला. मात्र उत्पादन केवळ ७५ किलोच झाल्याने शेतकऱ्याला मूग तोडणीची मजुरी घरून द्यावी लागली आहे. लागवडीचा खर्च सुद्धा वसूल झाला नसल्याने परिसरात मुगाचा सर्व्हे करून मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

Web Title: Only 75 kg production in six acres at Rohankhed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.