शिक्षक भरतीमध्ये विदर्भात केवळ ८३४ जागाच रिक्त!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2019 01:48 PM2019-04-02T13:48:12+5:302019-04-02T13:48:18+5:30
अकोला: शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टल ६ एप्रिलपासून सुरू होणार आहे; परंतु विदर्भात जिल्हा परिषद, मनपा, नगरपालिका आणि खासगी शाळांमध्ये सर्वात कमी रिक्त जागा दर्शविण्यात आल्या आहेत. विदर्भात केवळ ८३४ जागा रिक्त आहेत.
- नितीन गव्हाळे
अकोला: शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टल ६ एप्रिलपासून सुरू होणार आहे; परंतु विदर्भात जिल्हा परिषद, मनपा, नगरपालिका आणि खासगी शाळांमध्ये सर्वात कमी रिक्त जागा दर्शविण्यात आल्या आहेत. विदर्भात केवळ ८३४ जागा रिक्त आहेत. त्यातुलनेत उत्तर व पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडा, कोकण भागात शिक्षकांच्या सर्वाधिक ९ हजार ४३२ जागा रिक्त आहेत. या जागा पसंतीक्रम व जात संवर्गनिहाय निवडण्याची संधी उमेदवारांना मिळणार असली तरी विदर्भातील हजारो उमेदवारांमध्ये नाराजीचा सूर व्यक्त होत आहे.
राज्यातील शाळांमधील रिक्त दहा हजार पदांवर शिक्षक भरती होणार आहे. यासाठी जिल्हा परिषद, मनपा, नगरपालिका आणि खासगी शिक्षण संस्थांनी जाहिरातीसुद्धा प्रसिद्ध केल्या. या सर्वात जास्त रिक्त पदांच्या जाहिराती या उत्तर, पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडा, कोकण भागातील आहेत. विदर्भात अकराही जिल्ह्यांमध्ये त्या तुलनेत फारच नगण्य आहेत. शिक्षक भरतीच्या सर्व जागांसाठी शिक्षकांना अर्ज करता येत असले तरी, विदर्भातील बेरोजगार शिक्षकांना उत्तर, पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडा, कोकण भागातील शाळांमधील रिक्त पदांवर संधी मिळेल का? याविषयी शंका आहे. विदर्भात जागा कमी असल्यामुळे या भागातील शिक्षकांना उर्वरित महाराष्ट्रातील जागांसाठी आॅनलाइन अर्ज व नोंदणी करावी लागणार आहे; परंतु उर्वरित महाराष्ट्रातील शिक्षण संस्था वैदर्भीय उमेदवारांना संधी उपलब्ध करून देतील का, याविषयी उमेदवारांना संभ्रम आहे. शिक्षक भरतीमध्ये विदर्भाच्या तुलनेमध्ये उर्वरित महाराष्ट्रातील उमेदवारांनाच अधिक संधी मिळणार असल्याने, वैदर्भीय शिक्षक उमेदवारांमधून नाराजीचा सूर व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)
विदर्भातील रिक्त जागा
अकोला- ५८
अमरावती ३३
भंडारा- ९४
बुलडाणा- २६८
चंद्रपूर- ४0
गडचिरोली- १0५
गोंदिया- ८९
वाशिम- ३३
यवतमाळ- ११४
शिक्षक भरती ही संपूर्ण महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी आहे. भरतीमध्ये कोणताही दुजाभाव होणार नाही. केवळ गुणवत्तेच्या आधारेच उमेदवारांची निवड होणार आहे. ज्याच्याकडे गुणवत्ता. त्यालाच संधी मिळणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी काळजी करू नये.
-विशाल सोळंकी, शिक्षण आयुक्त,
महाराष्ट्र राज्य.