Corona vaccine : जिल्हास्तरीय बैठकीनंतरच १८ वर्षांवरील व्यक्तींना लसीसाठी नोंदणी शक्य!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 10:32 AM2021-04-28T10:32:15+5:302021-04-28T10:35:24+5:30
Corona vaccine : लसीकरण केंद्र संचालकांना लस उपलब्ध होत नाही तोपर्यंत लसीकरणाला सुरुवात करता येणे शक्य नाही.
अकोला : राज्यात १ मेपासून १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींसाठी लसीकरण मोहीम सुरू होत असून, पहिल्या टप्प्यात खासगी केंद्रांतच लस मिळणार आहे. त्याच्या नोंदणीस २८ एप्रिलपासून प्रारंभ होत असल्याचे शासनाने स्पष्ट केले. मात्र बुधवार, २८ एप्रिल रोजी जिल्हास्तरीय बैठकीनंतरच जिल्ह्यात नोंदणी प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती आरोग्य विभागामार्फत देण्यात आली आहे. १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींसाठी १ मेपासून लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी २८ एप्रिलपासून नोंदणीस प्रारंभ होत आहे. लसीकरणासाठी ‘कोविन पोर्टल’वर ऑनलाइन नोंदणी करणे अनिवार्य असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे. यासंदर्भात राज्य लसीकरण अधिकारी डॉ. पाटील यांनी राज्यातील सर्व जिल्ह्यांतील लसीकरण मोहीम हाताळणाऱ्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना यासंदर्भात महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार पहिल्या टप्प्यात ही मोहीम खासगी केंद्रांमध्ये राबविण्यात येणार आहे. मात्र लसीचा तुटवडा असल्याने खासगी केंद्रे लस कशी मिळवणार? याबाबत संभ्रमाची स्थिती आहे. त्यामुळे २८ एप्रिल रोजी ऑनलाइन नोंदणी करणाऱ्यांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. या अडचणी दूर करण्यासाठी बुधवारी जिल्हास्तरीय बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती आहे. या बैठकीनंतरच नाेंदणी प्रक्रियेबाबत आवश्यक मार्गदर्शक सूचना देण्यात येणार असल्याचे लसीकरण मोहिमेचे जिल्हा समन्वयक डॉ. मनिष शर्मा यांनी सांगितले.
ही आहे मोठी अडचण
सद्य:स्थितीत सर्वत्र लसीचा तुटवडा आहे. अशा परिस्थितीत १८ ते ४४ वर्षे वयोगटातील लाभार्थींसाठी शासनाकडून लस पुरविण्यात येणार नाही.
खासगी लसीकरण केंद्र संचालकांना थेट लस निर्मिती कंपन्यांकडून म्हणजेच पुणे आणि हैदराबाद येथून लस खरेदी करावी लागणार आहे.
त्यामुळे जिल्ह्यातील खासगी लसीकरण केंद्रे निश्चित नाहीत. परिणामी, नोंदणी करताना खासगी लसीकरण केंद्रांची नावे निवडताना अडचणी येऊ शकतात.
लाभार्थींनी नोंदणी केली, तरी लसीकरण केंद्र संचालकांना लस उपलब्ध होत नाही तोपर्यंत लसीकरणाला सुरुवात करता येणे शक्य नाही.
‘कोविन पोर्टल’वर करावी लागणार नोंदणी
२००३ मध्ये किंवा त्यापूर्वी जन्मलेल्या लोकांना ही नोंदणी करावी लागणार आहे. त्यासाठी ‘कोविन पोर्टल’वर जाऊन सेल्फ रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे. सेल्फ रजिस्ट्रेशन कोविन.जीओव्ही.इन या वेबसाइटवर नोंदणी करावी लागेल. एकूण तीन स्टेपमध्ये येथे नोंदणी होईल. लॉगइन केल्यानंतर सहा अंकी ओटीपी मिळेल. तो टाकल्यानंतर आनुषंगिक माहिती भरल्यानंतर आधार कार्ड, पॅन कार्ड तथा ड्रायव्हिंग लायसन्स क्रमांक प्रूफ म्हणून तेथे द्यावा लागेल. त्यानंतर लसीकरणाचे शेड्युल निवडावे लागेल. त्यात गेल्यावर जिल्हा व सेंटर निवडून नोंदणी करावी लागेल.
१ मेपासून सुरू होणाऱ्या लसीकरण मोहिमेच्या टप्प्यासंदर्भात बुधवार, २८ एप्रिल रोजी जिल्हास्तरीय बैठक घेण्यात येणार आहे. त्यानंतरच खासगी लसीकरण केंद्रांवरील नोंदणीसंदर्भात मार्गदर्शक सूचना देण्यात येईल.
- डॉ. मनिष शर्मा, जिल्हा समन्वयक, कोविड लसीकरण मोहीम, अकोला