जिल्हास्तरीय बैठकीनंतरच १८ वर्षांवरील व्यक्तींना लसीसाठी नोंदणी शक्य!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:20 AM2021-04-28T04:20:45+5:302021-04-28T04:20:45+5:30
ही आहे मोठी अडचण सद्य:स्थितीत सर्वत्र लसीचा तुटवडा आहे. अशा परिस्थितीत १८ ते ४४ वर्षे वयोगटातील लाभार्थींसाठी शासनाकडून लस ...
ही आहे मोठी अडचण
सद्य:स्थितीत सर्वत्र लसीचा तुटवडा आहे. अशा परिस्थितीत १८ ते ४४ वर्षे वयोगटातील लाभार्थींसाठी शासनाकडून लस पुरविण्यात येणार नाही.
खासगी लसीकरण केंद्र संचालकांना थेट लस निर्मिती कंपन्यांकडून म्हणजेच पुणे आणि हैदराबाद येथून लस खरेदी करावी लागणार आहे.
त्यामुळे जिल्ह्यातील खासगी लसीकरण केंद्रे निश्चित नाहीत. परिणामी, नोंदणी करताना खासगी लसीकरण केंद्रांची नावे निवडताना अडचणी येऊ शकतात.
लाभार्थींनी नोंदणी केली, तरी लसीकरण केंद्र संचालकांना लस उपलब्ध होत नाही तोपर्यंत लसीकरणाला सुरुवात करता येणे शक्य नाही.
‘कोविन पोर्टल’वर करावी लागणार नोंदणी
२००३ मध्ये किंवा त्यापूर्वी जन्मलेल्या लोकांना ही नोंदणी करावी लागणार आहे. त्यासाठी ‘कोविन पोर्टल’वर जाऊन सेल्फ रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे. सेल्फ रजिस्ट्रेशन कोविन.जीओव्ही.इन या वेबसाइटवर नोंदणी करावी लागेल. एकूण तीन स्टेपमध्ये येथे नोंदणी होईल. लॉगइन केल्यानंतर सहा अंकी ओटीपी मिळेल. तो टाकल्यानंतर आनुषंगिक माहिती भरल्यानंतर आधार कार्ड, पॅन कार्ड तथा ड्रायव्हिंग लायसन्स क्रमांक प्रूफ म्हणून तेथे द्यावा लागेल. त्यानंतर लसीकरणाचे शेड्युल निवडावे लागेल. त्यात गेल्यावर जिल्हा व सेंटर निवडून नोंदणी करावी लागेल.
१ मेपासून सुरू होणाऱ्या लसीकरण मोहिमेच्या टप्प्यासंदर्भात बुधवार, २८ एप्रिल रोजी जिल्हास्तरीय बैठक घेण्यात येणार आहे. त्यानंतरच खासगी लसीकरण केंद्रांवरील नोंदणीसंदर्भात मार्गदर्शक सूचना देण्यात येईल.
- डॉ. मनिष शर्मा, जिल्हा समन्वयक, कोविड लसीकरण मोहीम, अकोला