अकोला जिल्ह्यात केवळ आठ जणांनी केला प्लाझ्मा दान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2020 10:28 AM2020-07-20T10:28:27+5:302020-07-20T10:30:01+5:30

बरे झालेल्या रुग्णांपैकी केवळ ८ रुग्णांनी आतापर्यंत प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढाकार घेतला.

Only eight people donated plasma in Akola district! | अकोला जिल्ह्यात केवळ आठ जणांनी केला प्लाझ्मा दान!

अकोला जिल्ह्यात केवळ आठ जणांनी केला प्लाझ्मा दान!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : कोरोनावर मात करण्यासाठी जिल्ह्यात २९ जूनपासून प्लाझ्मा थेरपी सुरू करण्यात आली; परंतु किचकट प्रक्रियेमुळे बरे झालेल्या रुग्णांपैकी केवळ ८ रुग्णांनी आतापर्यंत प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढाकार घेतला. यामध्ये दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. कोरोनाविषयीची भीती आणि किचकट प्रक्रियेमुळे बरे झालेल्या रुग्णांचे रक्त संकलनाचे आरोग्य विभागासमोर मोठे आव्हान आहे.
कोरोनावर अद्यापही प्रभावी औषध आले नाही; परंतु प्लाझ्मा थेरपीद्वारे उपचाराला मान्यता मिळाल्याने सर्वसामान्यांच्या आशा वाढल्या आहेत. सर्वोपचार रुग्णालयात प्लाझ्मा थेरपी सुरूदेखील झाली असून, आतापर्यंत कोरोनातून बरे झालेल्या ८ रुग्णांनी प्लाझ्मा दान केले. किचकट प्रक्रियेमुळे प्लाझ्मासाठी रक्तसंकलनात आरोग्य यंत्रणेला विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे.
यातील सर्वात मोठी अडचण म्हणजे ज्या रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे होती, त्यांच्याच रक्तामधून प्लाझ्मा घेणे शक्य असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले; परंतु जिल्ह्यात आतापर्यंत दाखल बहुतांश रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणेच नव्हती.
त्यामुळे त्यांच्यात आवश्यक अ‍ॅन्टीबॉडीज विकसित झालेल्या नसल्याने त्याचा फायदा प्लाझ्मा थेरेपीमध्ये शक्य नाही.

या आहेत समस्या

  1. बहुतांश रुग्णांना कोरोनाची लक्षणे नव्हती. त्यामुळे त्यांचे रक्त संकलन शक्य नाही
  2. लक्षणे असणारे रुग्ण बरे झाल्यावर रक्तदान करण्यास तयार नाहीत
  3. रुग्ण बरा झाल्यानंतर २८ दिवसांची करावी लागते प्रतीक्षा
  4. बरे झालेल्या रुग्णांशी संपर्क साधण्यासाठी पर्याप्त मनुष्यबळ नाही.


आतापर्यंत ८ जणांनी प्लाझ्मा दिला असून, आणखी पाच ते सहा जण प्लाझ्मा दान करण्यास इच्छुक असून, प्लाझ्मा संकलनाची प्रक्रिया सुरू आहे. बरे झालेल्या रुग्णांनी प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढाकार घ्यावा.
- डॉ. श्रीराम चोपडे, विभाग प्रमुख, शासकीय ब्लड बँक, जीएमसी, अकोला

 

Web Title: Only eight people donated plasma in Akola district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.