पारस औष्णिक विद्युत प्रकल्पात दोन दिवस पुरेल एवढाच कोळसा; दोनपैकी एक संच बंद

By Atul.jaiswal | Published: September 30, 2021 12:17 PM2021-09-30T12:17:51+5:302021-09-30T12:18:11+5:30

Paras thermal power plant : केवळ एकच विद्युतनिर्मिती संच सुरू असून, एक संच बंद असल्यामुळे विद्युतनिर्मितीवर परिणाम झाला आहे.

Only enough coal for two days at the Paras thermal power plant | पारस औष्णिक विद्युत प्रकल्पात दोन दिवस पुरेल एवढाच कोळसा; दोनपैकी एक संच बंद

पारस औष्णिक विद्युत प्रकल्पात दोन दिवस पुरेल एवढाच कोळसा; दोनपैकी एक संच बंद

googlenewsNext

-  अतुल जयस्वाल

अकोला : महानिर्मितीच्या औष्णिक विद्युत प्रकल्पांपैकी महत्त्वाच्या असलेल्या अकोला जिल्ह्यातील पारस येथील औष्णिक विद्युत प्रकल्पात आजरोजी केवळ दोन दिवस पुरेल एवढाच कोळशाचा साठा उपलब्ध आहे. कोळशाच्या तुटवड्यामुळे या प्रकल्पातील दोनपैकी केवळ एकच विद्युतनिर्मिती संच सुरू असून, एक संच बंद असल्यामुळे विद्युतनिर्मितीवर परिणाम झाला आहे.

बाळापूर तालुक्यातील पारस येथील औष्णिक विद्युत प्रकल्पाची स्थापित क्षमता ५०० मेगावॅट असून, याठिकाणी २५०-२५० मेगावॅट क्षमतेचे दोन संच होते. एक व दोन क्रमांकांचे संच आता कालबाह्य झाल्यामुळे तीन व चार क्रमांकांचे संच कार्यान्वित आहेत. या दोन्ही संचांमधून पूर्ण क्षमतेने विद्युतनिर्मितीसाठी रोज साधारणत: कोळशाच्या दोन रेकचा पुरवठा होणे गरजेचे आहे. पावसामुळे सध्या राज्यभरात कोळशाचा तुटवडा निर्माण झाला आहे. वेस्टर्न कोलफिल्डस् लिमिटेडकडून (वेकोलि) ठरल्याप्रमाणे कोळशाचा पुरवठा होत नसल्याने प्रकल्पात कोळसा टंचाई निर्माण झाली आहे. सध्या दररोज सरासरी एकच रेक येत असल्यामुळे व कोळशाचा साठा मर्यादित असल्यामुळे पारस प्रकल्पातील चार क्रमांकाचा संच गत काही दिवसांपासून बंद ठेवावा लागत आहे. परिणामी विद्युतनिर्मिती प्रभावित झाली आहे.

दररोज हवा २ रेक कोळसा

प्रकल्पातील २५०-२५० मेगावॅट क्षमतेचे दोन्ही संच पूर्ण क्षमतेने कार्यान्वित ठेवण्यासाठी दररोज कोळशाच्या दोन रेकची गरज आहे. या प्रमाणात दररोज पुरवठा झाला, तर कोळशाचा साठा करून ठेवणे व दोन्ही संच सुरू ठेवणे शक्य होते. पूर्वी दिवसाला ३ ते चार रेक कोळशाचा पुरवठा होत असे; परंतु सध्या एक दिवसाआड एक रेक येत असल्याने प्रकल्पात पुरेशा प्रमाणात कोळशाचा साठाच नाही. त्यामुळे विद्युतनिर्मितीवर परिणाम झाला आहे.

 

प्रकल्पात सध्या दोन दिवस पुरेल एवढाच कोळसा शिल्लक आहे. दररोज एक रेक येत असल्याने नियोजन करावे लागत आहे. ४ क्रमांकाचा संच बंद ठेवण्यात आला असून, ३ क्रमांकाच्या संचातून मागणीप्रमाणे वीजनिर्मिती करण्यात येत आहे.

- विठ्ठल खटाडे, मुख्य अभियंता, औष्णिक विद्युत प्रकल्प, पारस

Web Title: Only enough coal for two days at the Paras thermal power plant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.