बँकेत व्यवहारासाठी पाच जणांनाच प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2020 04:22 PM2020-03-25T16:22:39+5:302020-03-25T16:22:56+5:30
बँकेत एकावेळी पाच ग्राहकांनाच प्रवेश दिला जाईल.
अकोला : कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी बँकांच्या दैनंदिन कामकाजाच्या पद्धतीमध्ये बदल करण्याचा निर्णय राज्यस्तरीय बँकर्स समितीने सोमवारी पुणे येथील बैठकीत घेतला. त्यानुसार बँकेत एकावेळी पाच ग्राहकांनाच प्रवेश दिला जाईल. तसेच त्यांच्या परस्परांमध्ये एक मीटरचे अंतर ठेवण्याची खबरदारी बँकांनी घ्यावी, सर्व एटीएम २४ तास कार्यरत ठेवावे, असे पत्र राज्यातील सर्वच लीड बँक मॅनेजर यांना पाठविण्यात आले.
बैठकीत उपस्थित बँकर्स समितीच्या प्रतिनिधींनी विविध मुद्दे मांडले. त्यावर निर्णय घेण्यात आले. त्या निर्णयांची प्रत सर्वच जिल्ह्यांतील लीड बँक मॅनेजर यांना पाठविण्यात आली. त्यामध्ये बँकांचे कामकाज सकाळी १० ते दुपारी २ या वेळेतच सुरू ठेवणे, बँकांमध्ये आवश्यक कामकाजासाठी गरजेएवढेच कर्मचारी उपस्थित ठेवणे, त्या कर्मचाऱ्यांना चक्राकार पद्धतीने उपस्थिती ठेवणे, बँकेत एकावेळी केवळ पाच ग्राहकांनाच प्रवेश देणे, उर्वरित ग्राहकांची रांग बँकेबाहेर लावणे, त्यांच्यामध्ये प्रत्येकी एक मीटरचे अंतर ठेवणे, याबाबतची सूचना बँकेच्या दर्शनी भागात लावणे, या पद्धतीने कामकाज करण्याचे निर्देश देण्यात आले. सोबतच एटीएममध्ये रोख भरणाºया संस्थांच्या कर्मचाऱ्यांनी ओळखपत्र तसेच बँक व्यवहाराचे पुरावे सोबत ठेवावे, प्रशासनाने एखादा भाग संवेदनशील घोषित केला असेल, तर त्याबाबतचा निर्णय घ्यावा, बँकेच्या सेवा-सुविधा अविरतपणे ग्राहकांना मिळाव्या, यासाठी बिझनेस कन्टिन्युइटी प्लॅननुसार कामकाज करावे, असेही राज्यस्तरीय बँकर्स समितीचे संयोजक एन. एस. देशपांडे यांनी पत्रात म्हटले आहे.