...तरच हुंडाबंदी कायद्याची अंमलबजावणी शक्य!

By admin | Published: April 25, 2017 01:13 AM2017-04-25T01:13:57+5:302017-04-25T01:13:57+5:30

लोकमत परिचर्चेतील सूर: हुंडाबंदी कायद्याविषयी अनास्था; समाजही जबाबदार

... only if dowry law enforcement can be possible! | ...तरच हुंडाबंदी कायद्याची अंमलबजावणी शक्य!

...तरच हुंडाबंदी कायद्याची अंमलबजावणी शक्य!

Next

अकोला: हुंडा देणे व घेणे कायद्याने गुन्हा आहे. तरीही हा गुन्हा खुलेआम घडतो आहे. नव्हे तर समाजाने हुंडापद्धतीची परंपराच जोपासली आहे. त्यामुळे हुंडाबंदी कायदा कमकुवत बनला आहे. समाजानेच हुंडाबंदी कायद्याला कमकुवत बनविले आहे. समाजाने हुंडा देण्या-घेण्याच्या परंपरेला फाटा दिला आणि हुंडा मागणाऱ्या कुटुंबात आम्ही मुलगीच देणार नाही, अशी भूमिका स्वीकारली तरच हुंडाबंदी कायद्याची अंमलबजावणी शक्य आहे. अन्यथा अनेक मुलींना हुंड्यासाठी बळी द्यावा लागेल, असे मत विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिला, विद्यार्थिनींनी व्यक्त केले.
लोकमततर्फे सोमवारी झालेल्या परिचर्चेमध्ये हुंडाबंदी कायदा आणि हुंडाबळी विषयावर विस्तृत चर्चा करण्यात आली.
शासनाने हुंडाबंदी कायदा केलेला असतानाही विवाह जुळविताना वर पक्षाकडून वधू पक्षाला रोख रकमेसह सोने, चांदीचे दागिने, भांडीकुंडी असा हुंडा द्यावा लागतो. त्यामुळे हुंडाबंदी कायदा हा कागदावरच राहिला आहे. हुंडाबळी गेल्यानंतरच या कायद्याचा वापर होतो असा आरोपही यावेळी करण्यात आला.
कायदाही हुंडापद्धतीसमोर कमकुवत बनला आहे. मुलगी, तिच्या कुटुंबांने हुंडा मागणाऱ्या मुलासोबत विवाह संबंध जुळविणार नाही आणि जोही मुलगा हुंडा मागेल, त्याच्याविरोधात हुंडाबंदी कायद्यानुसार कारवाई करण्याची भूमिका स्वीकारली तर समाजामध्ये मोठा बदल घडून येईल. कायदा कमकुवत नाही. समाजाने तो कमकुवत बनविला. हुंडाबंदी कायदा सक्षम झाला तर भविष्यात मुलींचा हुंड्यासाठी बळी जाणार नाही. कायद्याचा धाक निर्माण होईल, असे मतही परिचर्चेत सहभागी महिलांनी व्यक्त केले.

हुंडा देणे व घेण्याची समाजामध्ये सक्षम पद्धत निर्माण झाली आहे. वैज्ञानिक युगातही आम्ही रुढी, परंपरांना धरून आहोत. कायद्यांना बाजूला सारून आम्ही मुलीकडील कुटुंब पैसेवाले आहेत की गरीब आहेत, हे पाहतो आणि सबंध जोडतो. मुलीकडील पार्टी तगडी असेल तर हुंडाही तगडा घेतला जातो. हुंडा मागणाऱ्या मुलाला, त्याच्या कुटुंबाला मुलगी नकार देणार नाही, तोपर्यंत हुंडाबळी कायदा कागदावरच राहणार. कायदासुद्धा सक्षम करण्याची गरज आहे. डोळ्यांदेखत गुन्हा घडत असतानाही कोणीही त्याविरुद्ध आवाज उठवित नाही.
- अरुंधती सिरसाट, अध्यक्ष, गुणवंत शिक्षण संस्था

शासनाने हुंडाबंदी कायदा केला. हा कायदा कमकुवत नाही. त्याला समाजाने कमकुवत बनविले आहे. हुंडा कमी दिला किंवा माहेरावरून दुचाकी, चारचाकी घेण्यासाठी सासरकडून तगादा लावल्या जातो. यात मुलीचा बळी जातो. तेव्हा कायद्याची आठवण होते. मुलगा, मुलगी, त्यांचे कुटुंब उच्चशिक्षित असूनही कायद्याच्या विरोधात जाऊन हुंडा देतात व घेतात; मुलगी ही हुंड्यापेक्षा कमी नाही. त्यामुळे मुलींनीसुद्धा हुंडा मागणाऱ्या मुलांना लग्नास नकार दिल्याशिवाय समाजात सकारात्मक बदल घडणार नाही. त्यासाठी कुटुंबानेसुद्धा पाठबळ द्यायला हवे.
- विमल लोहिया, सेवानिवृत्त न्यायाधीश, कौटुंबिक न्यायालय

हुंडाबंदी कायदा कठोर असता तर शीतल वायाळसारख्या मुलींना हुंड्यासाठी बळी जावे लागले नसते. हुंडाबंदी कायदा केवळ कागदावर आहे. त्यामुळेच समाजामध्ये रोख रक्कम, दागदागिने, आंदण देण्याची प्रथा बोकाळत आहे. आहेर पद्धतीचा तर अतिरेक झाला आहे. चांगले लग्न करण्याची तर स्पर्धाच लागली आहे. त्यामुळेच वरपक्षाच्या अपेक्षा वाढल्या आहेत; परंतु आता रुढी, परंपरा मोडीत काढण्याचा काळ आला आहे. आता मुलींनीच पुढाकार घेण्याची गरज आहे. जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने मुला-मुलींना हुंडा न घेण्याबाबत शपथ देण्याची मोहीम हाती घेतली आहे.
- इंदुमती देशमुख, जिल्हाध्यक्ष, जिजाऊ ब्रिगेड

हुंडाबंदी कायदा केवळ कागदावर आहे. त्याची कठोरतेने अंमलबजावणीही होत नाही आणि समाजाकडूनही त्याचा प्रभावी वापर होत नाही. हुंडा देणे व घेणे गुन्हा असतानाही समाजात अनेक मुलींना त्यासाठी जीव द्यावा लागतो. घरची गरिबीची परिस्थिती असतानाही वधूपित्याला मुलीच्या प्रेमापोटी वरपक्षाला लाखो रुपयांचा हुंडा द्यावा लागतो. एवढा खर्च करूनही शेवटी मुलींना बळी जावे लागते, हे दुर्दैव आहे. कायद्याच्या कडक अंमलबजावणीसोबतच मुलगी व आई-वडिलांनी हुंडाविरोधी भूमिका घेणे ही काळाची गरज आहे.
- रत्ना चांडक, प्राचार्य, अकोला विधी महाविद्यालय

हुंडाबंदी कायदा आणखी कडक करून त्याची कठोरतेने अंमलबजावणी व्हावंी. हुंडा देणाऱ्या व घेणाऱ्यांच्या विरोधात पोलिसात तक्रार व्हावी आणि तक्रारकर्त्याचे नाव गुप्त ठेवण्यात यावे आणि मुलगी व आई-वडिलांनीसुद्धा हुंडा देण्यास नकार द्यावा. अशा मुली, कुटुंबाच्या पाठिशी समाजाने उभे राहावे. हुंडाबंदी कायद्याचा समाजाने आधार घ्यावा, तरच समाजात कोण्याही मुलीला, विवाहितेला हुंड्यासाठी बळी जावे लागणार नाही.
- संपदा सोनटक्के, विद्यार्थिनी प्रमुख, अभाविप

मुलगी हीच दागिना, हुंडा आहे. मुलाने, त्याच्या कुटुंबाने हुंडा मागितला तर मुलींनी त्यांना लग्नास नकार द्यावा समाजात अशा अनेक मुली समोर येत आहेत. ही सुरुवात आम्ही आमच्यापासूनच करू. कायदा आहे; परंतु कायद्याचा वापर करायला आम्ही शिकलो पाहीजे; परंतु कायद्याचा वापरही होत नाही आणि अंमलबजावणीही. त्यामुळेच वरपक्षासमोर वधूपित्याला झुकावे लागते; समाजानेसुद्धा हुंडा पद्धतीच्या विरोधात सामूहिकरीत्या उभे ठाकले पाहिजे.
- भाग्यश्री नसकरी, सहमंत्री, अभाविप, अकोला

वारंवार हुंडाबंदी कायदा असूनही त्याविषयी समाजात फारसी माहिती नाही. त्यामुळे कायदा नावाला आहे; परंतु कायद्याच्या आड सर्वच समाजामध्ये हुंडापद्धती मोठ्या प्रमाणात चालते. ही प्रथा बंद करण्यासाठी कायदा कठोर करून अंमलबजावणीवर भर देण्याची गरज आहे. कायद्यासंदर्भात समाजात जनजागृती व्हावी. मुला-मुलींसाठी हुंडाविरोधी कार्यशाळा व्हाव्यात. हुंडा प्रथा बंद व्हायला वेळ लागेल; परंतु हळूहळू का होईना, याविरुद्ध मुली उभ्या राहतील.
- पल्लवी घोगरे, विद्यार्थिनी

Web Title: ... only if dowry law enforcement can be possible!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.