जिल्हा बँकेचे केवळ नऊ हजार थकबाकीदार शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र!
By admin | Published: July 1, 2017 12:48 AM2017-07-01T00:48:14+5:302017-07-01T02:13:42+5:30
अकोला-वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा समावेश; थकित ३५ कोटी ४५ लाख रुपयांचे कर्ज होणार माफ !
संतोष येलकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : शासनाने जाहीर केलेल्या दीड लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. त्यामध्ये जिल्हा उपनिबंधकांकडे (डीडीआर) शुक्रवारी सायंकाळी प्राप्त झालेल्या माहितीनुसार, अकोला व वाशिम दोन जिल्हे कार्यक्षेत्र असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे दोन्ही जिल्ह्यातील केवळ ९ हजार २२१ थकबाकीदार शेतकऱ्यांचे ३५ कोटी ४५ लाखाचे थकित कर्ज कर्जमाफीसाठी पात्र ठरले आहे.
कर्जमाफी देण्यासंदर्भात २८ जून रोजी शासन निर्णय काढण्यात आला. शासन निर्णयातील कर्जमाफीच्या निकषानुसार, १ एप्रिल २०१२ ते ३० जून २०१६ पर्यंत थकबाकीदार असलेले शेतकरी दीड लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीसाठी पात्र ठरणार आहेत. त्यानुसार गत १ एप्रिल २०१२ ते ३० जून २०१६ पर्यंत पीक कर्ज थकीत असलेले शेतकरी आणि ३० जून २०१६ व ३० जून २०१७ पर्यंत कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती सादर करण्याचा आदेश शासनामार्फत जिल्हा उपनिबंधकांना (डीडीआर) देण्यात आला.
त्यानुसार अकोला व वाशिम हे दोन जिल्हे कार्यक्षेत्र असलेल्या अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती ३० जून रोजी सायंकाळी जिल्हा उपनिबंधकांकडे (डीडीआर)सादर करण्यात आली. त्यानुसार ९ हजार २२१ शेतकरी थकबाकीदार कर्जमाफीसाठी पात्र ठरणार आहेत.
नियमित परतफेड करणारे ५८ हजार
शेतकरी ठरणार अनुदानासाठी पात्र !
जिल्हा उपनिबंधकांकडे प्राप्त माहितीनुसार, ३० जून २०१६ व ३० जून २०१७ पर्यंत अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अकोला व वाशिम या दोन जिल्ह्यात ५८ हजार ५२४ शेतकरी कर्जाची नियमित परतफेड करणारे शेतकरी आहेत. शासन निर्णयानुसार कर्जाची नियमित परतफेड करणारे हे शेतकरी २५ हजार रुपयांपर्यंतच्या अनुदानासाठी पात्र ठरणार आहेत.
जिल्हा बँकेमार्फत प्राप्त माहितीनुसार, ३० जून २०१६ पर्यंत अकोला व वाशिम जिल्ह्यात बँकेचे ९ हजार २२१ थकबाकीदार शेतकरी असून, त्यांच्याकडे ३५ कोटी ४५ लाख रुपये कर्ज थकीत आहे. तसेच कर्जाची नियमित परतफेड करणारे ५८ हजार ५२४ शेतकरी आहेत.राष्ट्रीयीकृत बँकांकडून थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती अद्याप प्राप्त झाली नाही.
- जी.जी.मावळे
जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था)