हजारो दिव्यांगांसाठी जिल्ह्यात एकच दिव्यांग कक्ष!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2020 03:22 PM2020-02-01T15:22:00+5:302020-02-01T15:22:05+5:30
जिल्ह्यात तालुका स्तरावर दिव्यांग कक्षाची गरज निर्माण झाली आहे.
अकोला : दिव्यांग प्रमाणपत्रासाठी जिल्ह्यात एकच दिव्यांग कक्ष आहे. आॅनलाइन अर्ज भरल्यानंतर वैद्यकीय तपासणीसाठी हजारो दिव्यांगांना वेटींग लिस्टवर राहावे लागत आहे. अनेकदा डॉक्टरांची उपस्थिती नसल्याने ग्रामीण भागातून येणाऱ्या दिव्यांगांना वैद्यकीय तपासणी न करताच परतावे लागते. ही बाब लक्षात घेता जिल्ह्यात तालुका स्तरावर दिव्यांग कक्षाची गरज निर्माण झाली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयात दिव्यांगांसाठी दिव्यांग कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या ठिकाणी दिव्यांग प्रमाणपत्रासाठी आॅनलाईन अर्ज नि:शुल्क भरून दिला जातो; मात्र अर्ज भरल्यानंतर पुढील वैद्यकीय तपासणीसाठी दिव्यांगांना प्रतीक्षाच करावी लागत आहे. अनेकदा येथे डॉक्टरांची उपस्थिती नसल्याने वैद्यकीय तपासणीसाठी येणाºया दिव्यांगांना तसेच परतावे लागते. विशेष करून ग्रामीण भागातून येणाºया दिव्यांगांसाठी ही मोठी डोकेदुखी ठरत आहे. आॅनलाइन अर्ज करूनही दिव्यांगांची वेळेत वैद्यकीय तपासणी होत नसल्याने दिव्यांगांना दिव्यांग प्रमाणपत्रासाठी प्रतीक्षाच करावी लागत आहे.
वैद्यकीय तपासणीसाठी तारखांवर तारखा
वैद्यकीय तपासणीसाठी दिव्यांग कक्षात येणाºया दिव्यांगांना तारखेवर तारीख दिल्या जात असल्याचे वास्तव आहे. उपलब्ध मनुष्यबळाच्या तुलनेत तपासणीसाठी येणाºया दिव्यांगांची संख्या जास्त आहे. हा भार कमी करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेऊन दिव्यांग कक्ष ग्रामीण भागापर्यंत पोहोचविण्याची गरज आहे.
ग्रामीण रुग्णालयात दिव्यांग कक्षाची गरज
जिल्ह्यात सर्वोपचार रुग्णालयात एकमेव दिव्यांग कक्ष असून, त्यावर हजारो दिव्यांगांचा भार आहे. बहुतांश दिव्यांग हे ग्रामीण भागातील असल्याने त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी नेहमीच चकरा माराव्या लागत आहेत. ही बाब लक्षात घेता, दिव्यांगांसाठी तालुका स्तरावर दिव्यांग कक्षाची आवश्यकता आहे. हे कक्ष ग्रामीण रुग्णालयात स्थापन झाल्यास ग्रामीण भागातील दिव्यांगांना प्रमाणपत्रासाठी सोईस्कर ठरणार आहे.
विशेष शिबिराच्या माध्यमातून हजारो दिव्यांगांची वैद्यकीय तपासणी व दिव्यांग प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले आहे. असे असले, तरी येथील दिव्यांग कक्षात तपासणीसाठी येणाºया दिव्यांगांच्या तुलनेत मनुष्यबळ कमी आहे. हीच सुविधा ग्रामीण भागातही सुरू झाल्यास दिव्यांगांना सोईस्कर ठरणार आहे.
- डॉ. शिवहरी घोरपडे, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला.