केवळ २२० कोटींचे कर्ज वाटप
By admin | Published: May 19, 2017 01:32 AM2017-05-19T01:32:46+5:302017-05-19T01:32:46+5:30
पावसाळा तोंडावर; पीक कर्ज वाटप संथ गतीने!
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : यावर्षीच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यात १ हजार १४० कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनामार्फत निश्चित करण्यात आले असले, तरी त्यापैकी १० मेपर्यंत जिल्ह्यात केवळ २२० कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे पावसाळा तोंडावर आला असला, तरी पीक कर्जाचे वाटप संथ गतीने सुरू असल्याची स्थिती आहे. त्यानुषंगाने यावर्षी जिल्ह्यात खरीप पीक कर्जाचे उद्दिष्ट पूर्ण होणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
यावर्षीच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १ हजार १४० कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. गत १ एप्रिलपासून जिल्ह्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकसह राष्ट्रीयीकृत बँकांमार्फत पीक कर्ज वाटपास सुरुवात करण्यात आली आहे. पावसाळा सुरू होण्यास केवळ १२ दिवसांचा कालावधी उरला आहे. या पृष्ठभूमीवर जिल्ह्यात शेती मशागतीच्या कामांना वेग आला असून, खरीप पेरणीची तयारी शेतकऱ्यांनी सुरू केली आहे. त्यामध्ये पेरणीसाठी बी-बियाणे, खते आणि इतर खर्च भागविण्यासाठी शेतकऱ्यांकडून पीक कर्जाच्या मागणीत वाढ होत आहे. जिल्ह्यातील पीक कर्ज वाटपाच्या उद्दिष्टापैकी गत १० मेपर्यंत जिल्ह्यात केवळ २२० कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. उद्दिष्टाच्या तुलनेत बँकांमार्फत करण्यात आलेले पीक कर्जाचे वाटप बघता, पावसाळा तोंडावर येत असला, तरी पीक कर्ज वाटपाची प्रक्रिया मात्र संथ गतीने सुरू असल्याचे चित्र आहे. त्यामुळे यावर्षीच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यात पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट खरीप पेरण्या सुरू होईपर्यंत पूर्ण होणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पेरणीपूर्वी कर्जाचा लाभ मिळणार?
पावसाळा तोंडावर आला असून, पेरणीसाठी बियाणे व खते खरेदीसाठी शेतकऱ्यांची तयारी सुरू झाली आहे; परंतु पीक कर्ज वाटपाची प्रक्रिया संथ गतीने सुरू असल्याने, बियाणे आणि खतांचा खर्च भागविण्यासाठी शेतकऱ्यांना खरीप पेरणी सुरू होण्यापूर्वी पीक कर्जाचा लाभ मिळणार की नाही, असा प्रश्न निर्माण होत आहे.
खरीप हंगामासाठी जिल्ह्यात १ हजार १४० कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. त्यापैकी १० मेपर्यंत २२० कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. जुलै अखेरपर्यंत कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करावयाचे आहे.
- जी.जी. मावळे, जिल्हा उपनिबंधक.