केवळ सात टक्के लोकांनी घेतले लसींचे दोन्ही डोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 11:04 AM2021-07-15T11:04:54+5:302021-07-15T11:07:50+5:30
Corona Vaccination in Akola : ३ लाख ६६ हजार १६१ जणांनी कोरोनाचा पहिला डोस घेतला आहे.
- प्रवीण खेते
अकोला : मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातील लसीकरणाचा वेग वाढला आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण लसीकरण ३२.३२ टक्के झाले आहे; मात्र लसीचे दोन्ही डोस घेणारे केवळ ७.५७ टक्केच लोक आहेत. अजूनही सुमारे अडीच लाख लोकांना लसीच्या दुसऱ्या डोसची प्रतीक्षा आहे. त्या अनुषंगाने लसीकरण मोहिमेंतर्गत दुसऱ्या डोससाठी प्राधान्य दिले जात आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यातील कोविडची रुग्णसंख्या वाढ नियंत्रणात आली आहे, तर दुसरीकडे लसीकरणाचा वेगही काही प्रमाणात वाढलेला दिसून येत आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ४ लाख ७८ हजार २०१ लोकांनी कोरोनाची लस घेतली आहे. ही संख्या एकूण उद्दिष्टाच्या ३२.३२ टक्के आहे. यापैकी २४.७४ टक्के म्हणजेच ३ लाख ६६ हजार १६१ जणांनी कोरोनाचा पहिला डोस घेतला आहे. ही संख्या काही प्रमाणात समाधानकारक असली, तरी आतापर्यंत केवळ ७.५७ टक्के म्हणजेच केवळ १ लाख १२ हजार ४० लोकांनीच कोरोनाचे दोन्ही डोस घेतले आहे. हे प्रमाण वाढविण्यासाठी आरोग्य विभागातर्फे विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे.
दोन्ही डोसमधील अंतरामुळे लसीकरणाचा टक्का कमी
जिल्ह्यात बहुतांश लोकांना कोविशिल्ड लस देण्यात आली आहे. शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार कोविशिल्डचा पहिला डोस घेतल्यानंतर ८४ दिवसांनंतर लसीचा दुसरा डोस घेणे शक्य आहे. त्यामुळे बहुतांश लोकांना लसीच्या दुसऱ्या डोससाठी ८४ दिवस पूर्ण होण्याची प्रतीक्षा करावी लागत आहे. दोन्ही लसींमधील अंतर कमी केल्यास जिल्ह्यातील लसीकरणाचा वेग वाढणार आहे.
एकूण लोकसंख्या २०,१७,९२०
लसीकरणाचे एकूण उद्दिष्ट - १४,७९,४४२
पहिला डाेस ३,६६,१६१ (२४.७४)
दुसरा डोस १,१२,०४० (७.५७)
एकूण लसीकरण - ४,७८,२०१ (३२.३२)c