..तरच मिळेल किशोरवयीन युवकांना वाहन चालविण्याचा परवाना!
By admin | Published: September 19, 2016 02:43 AM2016-09-19T02:43:46+5:302016-09-19T02:43:46+5:30
५0 सीसी क्षमतेच्या नॉनगिअर वाहनाची अट; ‘आरटीओ’द्वारे अंमलबजावणी सुरू.
अकोला, दि. १८ : ५0 सीसी क्षमतेचे वाहन नसल्यास १६ ते १८ वर्षे वयोगटातील म्हणजेच कनिष्ठ महाविद्यालयातील युवकांना वाहन चालविण्याचा परवाना (लायसन्स) न देण्याचा निर्णय परिवहन आयुक्तालयाने घेतला आहे. ११ सप्टेंबरपासून या निर्णयाच्या अंमलबजावणीचा आदेश परिवहन आयुक्त कार्यालयाने दिला होता. त्यानुसार अकोला उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने याची अंमलबजावणी सुरू केली आहे. त्यामुळे आता वाहन चालविण्याची चाचणी देताना ५0 सीसी क्षमतेचे वाहन असेल, तरच किशोरवयीन मुलांना परवाना मिळणार आहे. मोटार वाहन कायद्यात १८ वर्षे पूर्ण असलेल्यांना १00 सीसी पुढील दुचाकी (विथगिअर) चारचाकी व अन्य वाहनांचे ड्रायव्हिंग लायसन्स देण्याची तरतूद आहे. या कायद्यात १६ ते १८ वयोगटातील युवकांना ५0 सीसी क्षमतेचे नॉनगिअर किंवा विथगिअर वाहन ग्राहय़ धरले जाईल, याबाबत स्पष्टता नसून ते स्पष्ट करावे, अशी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली होती. त्यानुसार यापुढे संबंधित वयोगटातील अर्जदारांकडे ५0 सीसी क्षमतेचे नॉनगिअर वाहन असेल तरच त्यांना लायसन्स द्यावे, अन्यथा लायसन्स देऊ नये, असा आदेश सर्व आरटीओंना देण्यात आला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी आरटीओ कार्यालयाने सुरू केली आहे. ५0 सीसी क्षमतेचे नॉनगिअर वाहन नसलेल्या किशोरवयीन युवकांना वाहन चालविण्याचा परवाना न देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.