पाणीटंचाई निवारणावर केवळ दोन कोटी खर्च
By admin | Published: June 1, 2015 02:37 AM2015-06-01T02:37:21+5:302015-06-01T02:37:21+5:30
प्रलंबित १0 कोटींच्या उपाययोजना कामांवर प्रश्नचिन्ह.
संतोष येलकर/अकोला : जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणाच्या कृती आराखड्यात विविध उपाययोजनांच्या कामांसाठी ११ कोटी ८३ लाख ३२ हजार रुपयांचा खर्च अपेक्षित असला तरी, १५ मे पर्यंत प्रत्यक्षात पूर्ण झालेल्या पाणीटंचाई निवारणाच्या कामांवर केवळ दोन कोटी खर्च झाले. पावसाळा तोंडावर आल्याच्या स्थितीत पाणीटंचाई निवारणाच्या कामांसाठी उर्वरित १0 कोटी २ लाख ४१ हजारांचा निधी केव्हा खर्च होणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. गत पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने, जिल्ह्यात निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्ह्यातील ४५८ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणाच्या ५८२ उपाययोजनांच्या कामांचा आराखडा डिसेंबर २0१४ मध्ये जिल्हाधिकार्यांमार्फत मंजूर करण्यात आला. पाणीटंचाई निवारणाच्या या प्रस्तावित कामांसाठी ११ कोटी ८३ लाख ३२ हजार रुपयांचा खर्चदेखील प्रस्तावित करण्यात आला. कृती आराखड्यातील प्रस्तावित एकूण उपाययोजनांच्या कामांपैकी १५ मे पर्यंत जिल्ह्यातील २00 गावांसाठी १३५ उपाययोजनांच्या कामांसाठी जिल्हाधिकार्यांकडून प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. या मंजूर कामांकरिता २ कोटी ६७ लाख ६५ हजार रुपयांचा निधीदेखील मंजूर करण्यात आला. प्रशासकीय मंजुरी देण्यात आलेल्या पाणीटंचाई निवारणाच्या कामांपैकी प्रत्यक्षात १२५ गावांमध्ये केवळ ६९ पाणीटंचाई निवारणाची कामे पूर्ण करण्यात आली असून, या कामांवर १ कोटी ८0 लाख ९१ हजार रुपयांचा निधी खर्च झाला. पावसाळा सुरू झाल्यानंतर पाणीटंचाई निवारणाची कामे करता येणार नाहीत. या पृष्ठभूमीवर पावसाळा तोंडावर आला असला तरी, जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणाच्या कृती आराखड्यात प्रस्तावित उपाययोजनांपैकी केवळ दोन कोटींचीच कामे पूर्ण झाल्याने, उर्वरित १0 कोटी २ लाख ४१ हजार रुपयांची प्रलंबित असलेली पाणीटंचाई निवारणाची कामे केव्हा पूर्ण होणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.