बाजार ‘अनलाॅक’नंतरच दुधाळ जनावरांची खरेदी लागणार मार्गी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 10:40 AM2021-06-21T10:40:56+5:302021-06-21T10:41:13+5:30
Akola News : दुधाळ जनावरांची खरेदी सुरू होणार तरी केव्हा, याबाबत जिल्ह्यातील लाभार्थींकडून प्रतीक्षा केली जात आहे.
- संतोष येलकर
अकोला: जिल्हा परिषद पशुसंर्वधन विभागामार्फत चालू आर्थिक वर्षात १० कोटी रुपयांची दुधाळ जनावरे वाटप योजना राबविण्यात येत असून, त्यासाठी २ हजार १७६ लाभार्थींची निवड करण्यात आली आहे; मात्र कोरोना काळात गुरांचे बाजार अद्याप बंद असल्याने, दुधाळ जनावरांच्या खरेदीची प्रक्रिया रेंगाळली आहे. गुरांचे बाजार ‘अनलाॅक’ झाल्यानंतरच दुधाळ जनावरांची खरेदी मार्गी लागणार आहे. त्यामुळे दुधाळ जनावरांची खरेदी सुरू होणार तरी केव्हा, याबाबत जिल्ह्यातील लाभार्थींकडून प्रतीक्षा केली जात आहे.
जिल्हा परिषद पशुसंर्वधन विभागामार्फत २०२०-२१ या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील लाभार्थींसाठी ७५ टक्के अनुदानावर १० कोटी रुपयांच्या निधीतून दुधाळ जनावरे वाटपाची योजना राबविण्यात येत आहे. त्यामध्ये ५ कोटी रुपयांच्या निधीतून म्हशी वाटपाची योजना व ५ कोटी रुपयांच्या निधीतून शेळीगट वाटपाच्या योजनेचा समावेश आहे. दोन्ही योजनेंतर्गत २ हजार १७६ लाभार्थींची निवड करण्यात आली असून, म्हैस वाटप योजनेत निवड करण्यात आलेल्या लाभार्थींना प्रत्येकी दोन म्हशी व शेळीगट वाटप योजनेत निवड करण्यात आलेल्या लाभार्थींना प्रत्येकी १० शेळ्या व एक बोकड याप्रमाणे शेळीगटाचे वाटप करावयाचे आहे. निवड करण्यात आलेल्या लाभार्थींना दुधाळ जनावरांचे वाटप करण्यासाठी जिल्ह्याबाहेर बडनेरा, खामगाव व अन्य ठिकाणच्या गुरांच्या बाजारातून दुधाळ जनावरांची खरेदी करावयाची आहे. परंतु कोरोना विषाणू संसर्गाच्या काळात गुरांचे बाजार अद्याप बंद असल्याने, दुधाळ जनावरांची खरेदी रेंगाळली आहे. त्यामुळे जिल्ह्याबाहेरील गुरांचे बाजार ‘अनलाॅक’ झाल्यानंतरच दुधाळ जनावरांची खरेदी प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यानुषंगाने गुरांचे बाजार केव्हा सुरू होणार आणि दुधाळ जनावरांची खरेदी केव्हा सुरू होणार, याबाबत योजनेंतर्गत निवड करण्यात आलेल्या जिल्ह्यातील लाभार्थींकडून प्रतीक्षा केली जात आहे.
योजनानिहाय प्रतीक्षेत असलेले असे आहेत लाभार्थी!
म्हैस वाटप योजना
७८३
शेळीगट वाटप योजना
१,३९३
‘समाजकल्याण’च्या योजनेतील दुधाळ जनावरांचेही वाटप रेंगाळले!
जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाच्या दुधाळ जनावरे वाटप योजनेंतर्गत शंभर टक्के अनुदानावर मागासवर्गीय लाभार्थींना म्हशी वाटपाच्या योजनेत निवड करण्यात आलेल्या लाभार्थींपैकी ७५ लाभार्थींना दुधाळ जनावरे वाटपाची प्रक्रियादेखील रेंगाळली आहे. कोरोना काळात गुरांचे बाजार बंद असल्याने म्हशी खरेदीची प्रक्रिया बंद असल्याने लाभार्थींना दुधाळ जनावरांचे वाटप रखडले आहे. यासोबतच जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाच्या योजनेंतर्गत गतवर्षी निवड करण्यात आलेल्या लाभार्थींपैकी १५० लाभार्थींसाठी म्हशी व शेळीगट खरेदीची प्रक्रियादेखील अद्याप मार्गी लागली नाही.
जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागामार्फत दुधाळ जनावरांचे वाटप योजनेंतर्गत २०२०-२१ या आर्थिक वर्षात म्हशी व शेळीगट वाटपासाठी जिल्ह्यातील २ हजार १७६ लाभार्थींची निवड करण्यात आली आहे. परंतु कोरोना काळात गुरांचे बाजार बंद असल्याने दुधाळ जनावरे खरेदीची प्रक्रिया अद्याप बाकी आहे. जिल्ह्याबाहेरील गुरांचे बाजार सुरू झाल्यानंतर दुधाळ जनावरे खरेदीची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.
डाॅ.जी.एम. दळवी
जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद, अकोला.