कोरोनाचा प्रादुर्भाव कायमच; २३८ जण पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:18 AM2021-05-08T04:18:57+5:302021-05-08T04:18:57+5:30
अकाेला : महापालिका क्षेत्रात काेराेनाची साथ कायम असून, शुक्रवारी शहरातील २३८ जणांना काेराेनाची लागण झाली आहे, तसा अहवाल जिल्हा ...
अकाेला : महापालिका क्षेत्रात काेराेनाची साथ कायम असून, शुक्रवारी शहरातील २३८ जणांना काेराेनाची लागण झाली आहे, तसा अहवाल जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाकडून मनपाला प्राप्त झाला. नागरिकांना गांभीर्य नसल्यामुळे काेराेनाचा कहर वाढत चालला आहे. बाजारात साहित्य खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांनी साेशल डिस्टन्सिंगचे नियम धाब्यावर बसविल्याचे चित्र आहे. यादरम्यान, काेराेनाची लक्षणे आढळून येणाऱ्या १,२२१ जणांनी चाचणी केली.
महापालिका क्षेत्रात काेराेनाचा वाढता प्रादुर्भाव चिंतेची बाब ठरत आहे. शहराच्या कानाकाेपऱ्यात काेराेनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ हाेत असली तरीही अकाेलेकरांना गांभीर्य नसल्याची परिस्थिती आहे. मागील काही दिवसांत काेराेनासदृश लक्षणे आढळून येणाऱ्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. त्यामुळे महापालिकेच्या चाचणी केंद्रांत नागरिक गर्दी करीत आहेत. शुक्रवारी चाचणी करणाऱ्यांची संख्या काही प्रमाणात कमी झाल्याचे समोर आले. दुसरीकडे शासनाने लागू केलेले कडक निर्बंध झुगारून देत नागरिक बाजारात साहित्य खरेदीसाठी गर्दी करीत आहेत. त्याचे परिणाम अकोलेकरांना भाेगावे लागत असून, शुक्रवारी शहरातील २३८ जणांना काेराेनाची लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे़
पूर्व व दक्षिण झाेनमध्ये रुग्णसंख्या वाढतीच!
शहरात काेराेनाबाधित रुग्णांची सर्वाधिक संख्या पूर्व व दक्षिण झाेनमध्ये आढळून येत आहे. पूर्व झोनमध्ये काेराेनाचे १०४ रुग्ण आढळून आले, तसेच पश्चिम झोनमध्ये ४४, उत्तर झोनमध्ये २२ व दक्षिण झोनमध्ये ६८, असे एकूण २३८ रुग्ण आढळून आले आहेत.
अकोलेकरांनो चाचणीसाठी पुढाकार घ्या!
काेराेनाचा प्रादुर्भाव वाढत असला तरी नागरिक चाचणीसाठी पुढाकार घेत नसल्याचे दिसून येत आहे. चाचणी न करता नागरिक घरीच उपचार घेत आहेत. त्यामुळे गंभीर रुगणांचे प्रमाण वाढले आहे. शुक्रवारी केवळ १,२२१ जणांनी चाचणी केली. यामध्ये ३४३ नागरिकांनी आरटीपीसीआर चाचणी केली, तसेच ८७८ जणांनी रॅपिड अँटिजन चाचणी केली आहे़